मुंबई : शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत म्हणाले की, भारतात लोकशाही आहे. तंगड्या तोडण्याची भाषा लोकशाहीत चालत नाही, तंगड्या सगळ्यांना असतात, हे लक्षात ठेवावं.


भाजप नेता जयभगवान गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्री मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणारं एक पुस्तक प्रकाशित केलं आहे. या पुस्तकाला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार विरोध केला होता. तसेच भाजपमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनादेखील (कोल्हापूरचे छत्रपती संभाजी, साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले, साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले) त्यास विरोध करण्याचे आवाहन केले होते. परंतु उदयनराजे भोसले यांनी भाजपला सवाल करण्याऐवजी संजय राऊतांवर जोरदार टीका केली होती. उदयनराजेंच्या टीकेला आज संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले.


संजय राऊत म्हणाले की, हातपाय तोडण्याची भाषा लोकशाहीमध्ये चालत नाही. छत्रपती शिवाजी महाराज ही कोणाची व्यक्तीगत मालमत्ता नाही. महाराष्ट्रातील 11 कोटी जनता ही छत्रपती शिवाजी महाराजांची वारसदार आहे. त्यामुळे सर्वांचा छत्रपती शिवाजी माहाजांवर सर्वांचा अधिकार आहे.


संजय राऊत उदयनराजेंना उद्देशून म्हणाले की, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. म्हणून आम्ही तुमचा आदर करतो. परंतु तुम्ही हात-पाय तोडण्याची भाषा करु नका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात कोणी अशी भाषा केली असती तर महाराजांनी त्याचेही हातपाय तोडले असते.


इंदिरा गांधींबाबतच्या वक्तव्यावरुन स्पष्टीकरण
संजय राऊत म्हणाले की, माजी पंतप्रधान इंदिरा गांधीबद्दल मी जे बोललो त्याबाबत चुकीची माहिती पसरवत आहेत. जेव्हा जेव्हा इंदिरा गांधींवर लोकांनी हल्ला चढवला तेव्हा त्यांच्या बाजूने सामनातून आम्ही लेख छापले आहेत. मी इंदिरा गांधीची भूमिका घेऊन उभा राहिलो आहे. मुंबईत अंडरवर्ल्डचं साम्राज्य होतं, तेव्हा करीम लालाचं मुंबईत मोठं प्रस्थ होतं. लाला हा मुंबईतल्या पठाणांचा नेता होता. त्यामुळे अनेक नेते लालाला भेटायचे. लालाच्या घरी त्याने अनेक नेत्यांसोबतचे फोटो लावले होते. सरहद गांधी ज्यांना आपण खान अब्दुल गफार खान या नावानेसुद्धा ओळखतो. तेसुद्धा लालासोबत जोडलेले होते. पठाणांच्या समस्या घेऊन लाला इंदिरा गांधी तसेच इतर पंतप्रधानांना भेटला आहे. मुंबईत अनेक नेते त्याला भेटायचे.


 महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे द्या, संजय राऊतांचे उदयनराजेंना आव्हान | सातारा | ABP Majha




छत्रपतींच्या वारसदारांनी भाजपतून राजीनामे द्यावेत : संजय राऊत | ABP Majha