मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी (रेल्वे स्टेशन, बस स्थानक, भाजीपाला मार्केट, शासकीय कार्यालय, विद्यापीठ, हॉस्पिटल प्रवेशद्वार) अशा गर्दीच्या ठिकाणी टनल सॅनिटायझरची उभारणी करून निर्जंतुकीकरण गरजेचे आहे. त्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीने पुढाकार घेऊन सॅनिटायझर टनेलची निर्मिती केली असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिली.


देशातील विविध भागांमध्ये अशा प्रकारच्या टनेलचा वापर केला जातोय. ज्यामध्ये दिल्ली, हरियाणा, कर्नाटक, तमिळनाडू राज्यांचा समावेश आहे. तसेच भारतीय रेल्वेकडून हरियाणा येथे अशा प्रकारच्या टनेलची निर्मिती करण्यात आलेली आहे. या टनेलला 'फुमिगेशन टनेल' असं म्हटले जातं. कर्नाटकातील हुबळी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येसुद्धा याच टनेलचा उपयोग केला जात आहे.


डब्ल्यूएचओच्या व्यवसायिक मार्गदर्शक सूचनेनुसार इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीच्या पुढाकाराने या टनलची निर्मिती केली आहे. यामध्ये पाण्यात 1 टक्के सोडियम हायपोक्लोराईडच्या मिश्रणाचा वापर केला जातो. टनेलमधून जाण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला 4 ते 5 सेकंदाची वेळ लागते. ज्या माध्यमातून निर्जंतुकीकरण केले जाते. अशा प्रकारच्या टनेलच्या निर्मितीसाठी 12 फूट लांबीच्या पोर्ट केबिनचा वापर केला गेला आहे. नोजलद्वारे निर्माण होणाऱ्या धुक्यांचे अधिक चांगले वितरण सुनिश्चित करण्यासाठी फ्लूड फ्लो सिस्टम अॅनसिस (ANSYS) या कार्यक्षम सॉफ्टवेअरमध्ये डिझाईन आणि सिम्युलेट केले गेले आहे.


द्रव पदार्थाप्रमाणे दोन फ्लूड प्रणालीच्या पद्धतीचा वापर येथे केला आहे. डिस्क्रिट पार्टिक्युलेट मॉडेलचा (डीपीएम) उपयोग सीएफडी मॉडेलमधे वापरून द्रवपदार्थ कसा सर्व ठिकाणी जाईल, हे बघितलं आहे. मानवी शरीरावर याचा प्रत्यक्षात काही विपरित परिणाम होतो आहे का नाही, याचा शोध घेण्यासाठी ही पद्धत वापरली जात आहे.


अशाप्रकारे कोरोनाशी लढा देण्यासाठी कमी खर्चात या अभिनव उपकरणांची निर्मिती करण्यात आलेली आहे. यामुळे कोरोनाच्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखला जाणे शक्य होईल. पण ज्या लोकांना काही अॅलर्जी आहे, त्यांनी यामध्ये प्रवेश करणे योग्य राहणार नाही. या टनेल निर्मितीसाठी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे कुलगुरू प्रा.अनिरुद्ध पंडित, शिवाजी विद्यापीठातील पदार्थ विज्ञान विभागाचे प्राध्यापक राजेंद्र सोनकवडे, प्रा. सचिन मठपती व त्यांचे विद्यार्थी विक्रम कोरपाले यांनी यासाठी संशोधन करून ह्या उपकरणाचे डिझाईन केले आहे.


संबंधित बातम्या : 

Cabinet Meeting | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Coronavirus Vaccine | कॅडिला कंपनीचा कोरोना लस बनवल्याचा दावा, प्राण्यांवर चाचणी सुरु

केशरी शिधापत्रिका धारकांना देखील सवलतीच्या दरात धान्य, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय