मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक पार पडली. वर्षा बंगल्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आपआपल्या जिल्ह्यांतून अनेक मंत्री या बैठकीत उपस्थित राहिले. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. लोकांची लॉकडाऊनच्या काळाच गैरसोय होऊ नये यासाठी सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. गेल्या महिन्यात 17 मार्चला मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती, त्यानंतर आज मंत्रिमंडळाची बैठक झाली.
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय
केशरी शिधापत्रिका धारकांना देखील सवलतीच्या दरात धान्य
केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ प्रती व्यक्ती देण्याबाबत आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्यांना 8 रुपये प्रती किलो गहू आणि 12 रुपये प्रती किलो तांदूळ अशा दरात धान्य मिळेल. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आजच पत्र लिहून संबंधित मंत्रालयाला आवश्यक ते निर्देश देण्याची विनंती देखील केली.
शिवभोजन योजना आता तालुका स्तरावर, पाच रुपयात थाळी
शिवभोजन योजनेचा तालुका स्तरावर विस्तार करून पुढील तीन महिने 5 रुपये इतक्या दरात शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मजुर, स्थलांतरीत, बेघर तसेच बाहेरगावचे विद्यार्थी व इतर लोक यांचे जेवणाअभावी हाल होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांना मान्यता
- 13 मार्च 2020 च्या अधिसुचनेनुसार राज्यात साथरोग कायदा 1897 लागू केला.
- उपाययोजनांसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 13 मार्च रोजीच उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली.
- 14 मार्च 2020 रोजी महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 अधिसूचना लागू झाली. त्याअंतर्गत अलगीकरण व विलगीकरण याबाबतचे नियम ठरवण्यात आले. तसेच अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई, खाजगी रुणालयामध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करणे याबाबी या नियमावलीमध्ये आहेत.
- गर्दीमुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या.
- आपत्कालीन परिस्थितीत औषधे व यंत्रसामुग्री व उपकरणे खरेदी करण्यासाठी आरोग्य सेवा आयुक्त तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान त्याचप्रमाणे संचालक, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये यांच्या स्तरावर समिती गठीत करून त्यांना काही अटी व शर्तीनुसार खरेदी करण्यास मुभा देण्यात आली.
वर्षा बंगल्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, जयंत पाटील, एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे हे मंत्री उपस्थित होते. तर मंत्रालयातून उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सुभाष देसाई, दिलीप वळसे पाटील, नवाब मलिक, अनिल देशमुख, राजेश टोपे, वर्षा गायकवाड, डॉ. जितेंद्र आव्हाड, अस्लम शेख, अनिल परब उपस्थित होते. तर इतर मंत्री तसेच राज्यमंत्री आपापल्या जिल्ह्याहून या बैठकीत सहभागी झाले
Coronavirus Update | काय आहे केंद्राचा कोरोनासंदर्भातील मास्टर प्लॅन?
संबंधित बातम्या :
Cabinet Meeting | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Coronavirus Vaccine | कॅडिला कंपनीचा कोरोना लस बनवल्याचा दावा, प्राण्यांवर चाचणी सुरु
केशरी शिधापत्रिका धारकांना देखील सवलतीच्या दरात धान्य, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय