Swabhimani Paksha leader Raju Shetti : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Swabhimani Paksha leader Raju Shetti) यांनी ऊस उत्पादक तसेच साखर उद्योगामध्ये पसरलेली अस्वस्थता दूर करण्यासाठी तसेच केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर आणि सांगलीत ऊसतोड बंद आंदोलन पुकारले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सांगली जिल्ह्यात गांधीगिरी मार्गाने आंदोलन करण्यात आले. 


आज आणि उद्या ऊस वाहतूक आणि ऊस तोड न करण्याचे आवाहन स्वाभिमानीकडून करण्यात आलं आहे. सांगली-तासगाव मार्गावर ट्रॅक्टरमधून सुरु असलेली ऊस वाहतूक स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी रोखली. खानापूर तालुक्यातील उदगिरी साखर कारखान्याकडे होणारी ऊस वाहतूक स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रोखली. यावेळी ऊस भरून निघालेला ट्रॅक्टर थांबवून ट्रॅक्टरमधील हवा सोडून देण्यात आली. दुसरीकडे वाळवा तालुक्यातील हुतात्मा सहकारी साखर कारखान्याकडे वाहतूक होणाऱ्या चार बैलगाडीच्या टायरमधील हवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोडली. 


एकरकमी एफआरपी मिळाली पाहिजे, तीन टप्प्यात एफआरपी देण्याचा राज्य शासनाने केलेला कायदा रद्द करावा, वजन काटे ऑनलाईन झाले पाहिजेत, रिकव्हरीतील चोरी थांबली पाहिजे, तोडीला द्यावे लागणारे पैसे बंद झाले पाहिजेत, आदींसह अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानीने आंदोलन पुकारले आहे. 


तर 18 तारखेपासून काय करायचे ते सांगतो


राजू शेट्टी यांनी आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, शेतकऱ्यांची अस्वस्थता समजू शकतो, राग समजू शकतो, पण व्यक्त करण्याची ही वेळ नाही. 18 तारखेनंतर मी निश्चितच तुम्हाला कार्यक्रम देणार आहे, त्यावर निश्चितच तुम्ही राग व्यक्त करा. आता शांततेच्या मार्गाने आंदोलन करा.  शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला ऊसतोड कामगार, वाहन चालक आणि साखर कारखानदार यांनी प्रतिसाद द्यावा, असेही ते म्हणाले.


हिवाळी अधिवेशनात एकरकमी FRP चा कायदा मंजूर करावा


ऊस उत्‍पादक शेतकऱ्यांना दोन टप्प्यातील एफआरपी (FRP) देण्याऐवजी एकरकमी FRP देण्यात यावी, हिवाळी अधिवेशनात यासाठीचा कायदा मंजूर करावा, तसेच, एफआरपीचे सूत्र बदलून त्यामध्ये वाढ करावी या प्रमुख मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आल्या आहेत. या मागण्यांसाठी राज्यभरात आज आणि उद्या दोन दिवस ऊसतोड बंद आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान, कारखानदारांना दोन दिवस कारखाने बंद ठेवण्यास सांगितले आहे. जर कारखाने बंद ठेवले नाहीत तर संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या