Nandurbar Agriculture News : यावर्षी परतीच्या पावसानं (Rain) राज्यात धुमाकूळ घातल्यामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच परतीचा पाऊस लांबल्यानं रब्बी हंगामातील पेरण्या (Rabi Season sowing) देखील लांबल्या आहेत. नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यात आत्तापर्यंत रब्बीच्या फक्त 15 टक्केच पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. आतापर्यंत नऊ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी पूर्ण झाली आहे. तर काही भागात मशागतीची कामं सुरू आहेत.
नंदूरबार जिल्ह्यात 62 हजार 974.90 हेक्टर पिकांचे क्षेत्र आहे. त्यात गहू, हरभरा, मका, ज्वारी या रब्बी पिकांची पावसाळा संपल्यावर लागवड केली जाते. यंदा परतीचा पाऊस चांगलाच लांबला. पाऊस लांबल्यामुळं आणि परतीच्या पावसामुळं मका, ज्वारी, सोयाबीन पिकाच्या काढणीला उशीर झाला आहे. तसेच परतीच्या पावसामुळं जमिनीचा ओलावा टिकून राहिल्याने मशागतीच्या कामांना उशीर झाला आहे, त्यामुळं यंदा राज्यात रब्बीचा हंगाम लांबला आहे. नंदूरबार जिल्ह्यात आतापर्यंत ज्वारी तीन हजार हेक्टर, गहू दोन हजार हेक्टर, मका तीन हजार हेक्टर, हरभरा 900 हेक्टर क्षेत्रावर पिकांची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळं आता उर्वरित रब्बीच्या क्षेत्रावर पेरणी लवकर पूर्ण होणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यात अनेक भागात मजुरांची टंचाई
राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. याचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांना (Farmers) बसला आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं वाया गेली आहेत. उत्तर महाराष्ट्रात देखील अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडं तयार झालेली पिकं काढणीला आली आहेत. या पिकांची काढणी करणं हे शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान ठरत आहे. कारण सध्या मजुरांची मोठी टंचाई भासत आहे. नंदूरबार जिल्ह्यात शेतकरी शेती कामासाठी मजुरांची शोधाशोध करत आहेत. मजुरांचे मोठ्या प्रमाणावर जिह्यातून स्थलांतर झाले आहे. नंदूरबार जिल्ह्यात खरीप हंगामात कापूस त्या खालोखाल मिरचीची लागवड केली जाते. परतीच्या पावसामुळं कापूस आणि मिरचीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मिरची आणि कापूस पावसात सापडल्यानं कापसाची काढणी आणि मिरचीची तोडणी करणं शेतकऱ्यांना क्रम प्राप्त आहे. त्यात मजूर मिळत नसल्यानं पावसात सापडलेली मिरची आणि कापूस खराब होत आहे. त्यातच योग्य भाव मिळत नसल्यानं आणि वाढीव मजुरी देणं ही परवडत नसल्यानं शेतकरी अडचणीत सापडला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: