Raju Shetti : ऊसाला मिळणाऱ्या एफआरपीच्या (FRP) च्या मुद्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana) चांगलीच आक्रमक झाली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दोन टप्प्यात एफआरपी देण्याऐवजी एकरकमी देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टींनी (Raju Shetti) केली आहे. यासह विविध मागण्यांसाठी आज (17 नोव्हेंबर) आणि उद्या (18 नोव्हेंबर) स्वाभिमानीने ऊसतोड बंद आंदोलन पुकारलं आहे. दरम्यान, या दोन दिवसात जर कारखाने सुरु ठेवले तर संघर्ष होणार असल्याचा इशारा राजू
शेट्टींनी दिलाय.


हिवाळी अधिवेशनात एकरकमी FRP चा कायदा मंजूर करावा


ऊस उत्‍पादक शेतकऱ्यांना दोन टप्प्यातील एफआरपी (FRP) देण्याऐवजी एकरकमी FRP देण्यात यावी, हिवाळी अधिवेशनात यासाठीचा कायदा मंजूर करावा, तसेच, एफआरपीचे सूत्र बदलून त्यामध्ये वाढ करावी या प्रमुख मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आल्या आहेत. या मागण्यांसाठी राज्यभरात आज आणि उद्या दोन दिवस ऊसतोड बंद आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान, कारखानदारांना दोन दिवस कारखाने बंद ठेवण्यास सांगितले आहे. जर कारखाने बंद ठेवले नाहीत तर संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन


साखरेची किमान विक्री किंमत 31 रुपयांवरुन 35 रुपये करणे आवश्यक आहे. तसेच इथेनॉल निर्मितीचा खर्च वजा करुन राहणाऱ्या र‍कमेतील 70 टक्‍के रक्‍कम शेतकऱ्यांना द्यावी, सर्व प्रकारच्या इथेनॉलमध्ये प्रतिलिटर पाच रुपयांची वाढ करावी. तसेच खुल्या साखर निर्यात धोरणांतर्गत साखर निर्यातीला परवानगी द्यावी, आदी प्रमुख मागण्यांकडे केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. आता शांततेच्या मार्गाने आंदोलन करा, प्रश्न सुटले नाहीत तर 18 तारखेपासून काय करायचे ते मी सांगतो असे शेट्टी म्हणाले. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला ऊसतोड कामगार, वाहन चालक आणि साखर कारखानदार यांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन राजू शेट्टींनी केलं आहे. 


कारखानादरांना पाठिंबा देण्याचं आवाहन


दरम्यान, आज आणि उद्या दोन दिवस ऊसतोड बंद ठेवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागण्यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी राजू शेट्टींनी सर्व कारखानदारांना केली आहे. दरम्यान, आज कारखानदार या मागणीला कसा प्रतिसाद देतात यावर हे आंदोलन कसं होणार हे अवलंबून असणार आहे. यामध्ये FRP अधिक 350 रुपये दर देण्याची मागणी ऊस परिषदेत केली होती. ती मागणी देखील शेट्टींनी लावून धरली आहे. तसेच साखरेला प्रतिटन 3 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, तसेच इथेनॉलला प्रतिलीटर पाच रुपये दर वाढवून द्यावा अशीही मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केंद्र सरकारकडे केली आहे. कोल्हापूर, सांगली या दोन्ही जिल्ह्यात हे आंदोलन आज आणि उद्या होणार आहे. त्यामुळं याला आता कारखानदार कसा प्रतिसाद देतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पण कारखाने सुरु ठेवल्यास संघर्ष होणार असल्याचा इशारा शेट्टींनी दिलाय.


महत्त्वाच्या बातम्या:


Kolhapur News : कोल्हापूर शहरात ऊस वाहतुकीसाठी मार्ग ठरला; हंगाम संपेपर्यंत बदल कायम राहणार