Sangli Loksabha Election 2024 : राज्यात सर्वत्र अठराव्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून उद्या 13 मे रोजी चौथ्या टप्पासाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. यंदाची लोकसभा (Lok Sabha Election 2024) ही महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघात अस्मितेची लढाई झाली आहे. त्यात प्रामुख्याने बारामती, सातारा, शिरुर, सांगली यांसारख्या अनेक लोकसभा मतदारसंघाकडे विशेष लक्ष लागून राहिलं आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभेत कोण बाजी मारणार आणि कोणाला माघार घ्यावी लागणार हे येत्या 4 जूनला स्पष्ट होईलच.


या निकालाची उत्सुकता ज्याप्रमाणे राजकीय पक्ष, उमेदवार, कार्यकर्त्यांना आहे, तशीच ती सर्वसामान्यांना देखील आहे. निवडणुकांचा अंतिम कौल जाहीर होण्यास अद्याप अवकाश असला तरी त्याआधीच या निवडणुकांच्या निकालावरुन राज्यात अनेक ठिकाणी शर्यत आणि पैजे लागली आहे. अशातच चुरशीची लढत असलेल्या सांगली मतदारसंघातील उमेदवारांच्या विजयावरुन दोन कार्यकर्त्यांनी चक्क आपली दुचाकीच शर्यतीत लावली आहे.  


उमेदवारांच्या विजयावरुन चक्क दुचाकी शर्यतीत


महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावरून सर्वाधिक चर्चेत आलेला मतदारसंघ म्हणजे सांगली. ही जागा काँग्रेसला मिळावी यासाठी विश्वजीत कदम आणि विशाल पाटील हे आग्रही होती. पण सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला गेल्यानंतर विशाल पाटलांनी या ठिकाणी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढली. 7 मे रोजी सांगली लोकसभेसाठी मतदान पार पडलं. सांगलीच्या जागेसाठी भाजपचे संजयकाका पाटील आणि विशाल पाटील यांच्यामध्येच खरी लढाई असल्याची चर्चा आहे.


महाविकास आघाडीचे नेते, विशेषतः काँग्रेसचे नेते जरी शिवसेनेच्या चंद्रहार पाटलांच्या स्टेजवर दिसत असले तरी त्यांनी विशाल पाटलांच्या मागे आपली ताकद लावल्याची, त्यांना छुपी मदत केल्याची चर्चा आहे. त्यामुळे विशाल पाटील यांचं पारडं जड असल्याचं राजकीय विश्लेषक सांगत आहेत. अशातच आता या शर्यतीत सर्वसामान्य कार्यकर्तेही उतरल्याचे बघायला मिळत आहे. यात दोन कार्यकर्त्यांनी चक्क आपली दुचाकी वाहने निकालाच्या शर्यतीत उतरवली आहेत. 


नेमका प्रकार काय?     


सांगली लोकसभेची निवडणूक उमेदवारी जाहीर होण्यापासून चर्चेत येत गेली. शेवटी भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील (Sanjaykaka Patil) आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) या दोन उमेदवारांमध्येच आता खरी लढाई असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीचा निकाल येण्यापूर्वी सांगली लोकसभा मतदारसंघात दोन कार्यकर्त्यामध्ये पैजे लागल्याची एक पोस्ट सोशल मिडियावर तूफान वायरल होते आहे.


यात असे म्हटले आहे की, सांगली लोकसभा मतदारसंघातून विशाल पाटील निवडून आले तर रमेश संभाजी जाधव यांच्याकडून यूनिकॉर्न गाडी गौस मुबारक मुलाणी यांना देण्यात येईल. तसेच संजयकाका पाटील निवडून आले तर गौस मुबारक मुलाणी यांचेकडून बुलेट गाडी रमेश संभाजी जाधव यांना देण्यात येणार असल्याचे यात नमूद केलं आहे. तर या पैजेसाठी काही लोकांना साक्षीदार म्हणून त्यांचे नाव आणि स्वाक्षरी देखील घेतली आहे. आता सांगली लोकसभेत कोण बाजी मारणार आणि कोणाला माघार घ्यावी लागणार हे येत्या 4 जूनला स्पष्ट होईल. मात्र, या पैजेची उत्सुकताही आता सांगलीकरांना लागली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या