नवी दिल्ली  : आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर ते तुरुंगातून बाहेर आले.तुरुंगाबाहेर येताच त्यांनी भाजप आणि केंद्रातील मोदी सरकावर हल्लाबोल केला. मी या हुकूमशाहीशी लढेन, मी देशवासियांना विनवणी करतो, तुम्ही देशाला वाचवा. पंतप्रधान मोदींची हुकूमशाही आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) हे देशावर लादायचे आहे, असे झाल्यास राज्यघटना रद्द होईल. संविधान वाचवण्यासाठी आता केंद्र सरकारला सत्तेतून बेदखल करण्याची गरज असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले. त्यानंतर, आज पत्रकार परिषद घेऊन केजरीवाल यांनी आपचा जाहीरनामाच प्रसिद्ध केला. देशात इंडिया आघाडीचं (India Alliance) सरकार आल्यास देशवासीयांसाठी 10 गॅरंटी केजरीवाल यांनी देऊ केल्या आहेत.


काँग्रेस आपला जाहीरनामा देशातील जनतेपुढे मांडताना 5 गॅरंटी दिल्या आहेत. आता, अरविंद केजरीवाल यांनी 10 गॅरंटी देत इंडिया आघाडीला सत्ता देण्याचं आवाहन केलं आहे. त्यानुसार, केजरीवाल यांनी वीज, शिक्षण, वैद्यकीय उपचार यांसह राष्ट्र सर्वोतोपरी म्हणत देशाच्या सैन्यदलास विशेष अधिकार देण्याची घोषणा केली आहे.  


केजरीवाल यांच्या 10 गॅरंटी


1. अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन देशातील 140 कोटी भारतीयांसाठी 10 गॅरंटी जाहीर केल्या आहेत. केजरीवाल की 10 गॅरंटी म्हणत ह्या गॅरंटी देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये, सर्वप्रथम देशवासीयांना 24 तास वीज देण्यात येईल, असे सांगत देशातील गरिबांना 200 युनिट वीज मोफत देण्याची घोषणा केजरीवाल यांनी केली. विशेष म्हणजे आमच्या सरकारने दिल्ली आणि पंजाबमध्ये अगोदरच 200 युनिट वीज मोफत दिल्याचंही त्यांनी सांगितलं. 


2. सरकारी शाळांमधून खासगी शाळांपेक्षा उच्च दर्जाचं शिक्षण देण्यात येईल. त्यासाठी, राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून 5 लाख कोटी रुपयांचा खर्च देण्यात येईल. देशातील गावागावातील कानाकोपऱ्यातील प्रत्येक शाळेत असे उच्चतम दर्जाचे शिक्षण देण्याची दुसरी गॅरंटी असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले. देशातील 18 कोटी विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल,असे केजरीवाल यांनी म्हटले.


3. केजरीवाल यांनी तिसरी गॅरंटी देताना, देशातील रुग्णालयांची हालात सुधारणार असून मोहल्ला क्लिनीक प्रत्येक गावात, लोकल शहरात सुरू करण्यात येतील, या मोहल्ला क्लिनीकमधून नागरिकांवर मोफत उपचार केले जातील, असे केजरीवाल यांनी म्हटले. 


4. राष्ट्र सर्वोपरी ही आमची चौथी गॅरंटी आहे, चीनने आमच्या जमीनीवर ताबा घेतला आहे, पण केंद्र सरकार ते मान्य करत नाही. त्यामुळे, सैन्य दलास स्वतंत्रता देण्यात येईल, त्यासोबतच डिप्लोमेटीक मार्गानेही ती जमीन परत मिळवण्यात येईल.


5. अग्निवीर योजना बंद करुन सैन्य दलातील भरती कायम केली जाईल. अग्निवीर भरती करण्यात आलेल्या सैन्य दलातील जवानांना नोकरीत कायम केले जाईल. देशाच्या सैन्य दलास ताकद देण्याचं काम आमचं सरकार करेल, असेही केजरीवाल यांनी म्हटले.


6. सहावी गॅरंटी ही शेतकऱ्यांसाठी आहे, शेतकरी भीक मागत नाही, त्यांचा हक्क मागतोय. त्यामुळे, स्वामीनाथन आयोगानुसार शेतकऱ्यांना हमीभाव देण्यात येईल, त्यांच्या पिकांना योग्य दर देण्यात येईल, अशी गॅरंटी केजरीवाल यांनी दिली.


7. सातवी गॅरंटी देताना देशाची राजधानी असलेल्या दिल्लीला पूर्ण दर्जा देणार असल्याचे केजरीवाल यांनी जाहीर केले. गेल्या कित्येक वर्षांपासून दिल्लीकरांची ही मागणी आहेत. 


8. देशातील बेरोजगारीसाठी आम्ही बारकाईने प्लॅनिंग केलं आहे, त्यानुसार दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देण्याची गॅरंटी अरविंद केजरीवाल यांनी दिली. 


9. भाजपाच्या वॉशिंग मशिनला तोडण्याचं काम करणार, प्रामाणिक लोकांना तुरुंगात टाकण्याचं आणि भ्रष्टाचारी लोकांना संरक्षण देण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे, आमचं सरकार आल्यास भाजपाचं वाशिंग मशिन तोडण्याचं काम आम्ही करू, अशी गॅरंटी केजरीवाल यांनी दिली.


10. सर्वात शेवटी 10 वी गॅरंटी म्हणजे, देशातील व्यापाऱ्यांसाठी धोरणं आखण्यात येतील. गेल्या 10 वर्षात 12 लाख श्रीमंत लोक व्यापार-उद्योग बंद करुन विदेशात गेले आहेत. त्यामुळे, जीएसटी बाहेर करण्यात येईल. जीएसटी सुरळीत केलं जाईल. अशी व्यवस्था निर्माण केली जाईल, जी व्यापाऱ्यांना जास्त परवानग्यांची गरज असणार नाही. चीनला उद्योग-व्यापारात मागे टाकण्याचं काम आपणास करायचं आहे, ही आमची 10 वी गॅरंटी आहे, असे केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेतून जाहीर केले.






हेही वाचा


मोदी सत्तेत आल्यास उद्धव ठाकरेंसह बडे नेते जेलमध्ये जाणार, अरविंद केजरीवाल यांच्या दाव्याने खळबळ