Sangli Rain Update : सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 11.3 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक 51 मि. मी. पावसाची नोंद झाली. चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी झाली आहे. कृष्णा नदी सध्या पात्रातूनच वाहत असून पाणी पातळी 6 फुटांजवळ आहे. जिल्ह्यात पावसाची थांबून थांबून संततधार सुरूच आहे.


जिल्ह्यात (Sangli Rain Update) दीर्घ प्रतीक्षेनंतर कालपासून मान्सूनचे आगमन झाले. मिरज शहरासह जिल्ह्याच्या काही भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. येत्या ९ जुलैपर्यंत जिल्ह्याच्या बहुतांश भागात मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळणार आहेत. पावसाच्या हजेरीने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 


सांगली, मिरज शहर व परिसरात गेल्या चोवीस तासापासून पावसाची रिपरिप सुरु आहे. शहराच्या सखल भागात त्यामुळे पाणी साचून राहिले आहे. जिल्ह्याच्या अन्य भागातही पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यात मंगळवारी सकाळी ८ वाजता नोंदलेल्या आकडेवारीनुसार मागील चोवीस तासात सरासरी ११.३ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आटपाडी, जत वगळता अन्यत्र कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासादायी चित्र निर्माण झाले आहे. 


शिराळा पश्चिम भागात गेल्या दोन दिवसापासून संततधार पाऊस सुरू असून सर्व नाली ओढे तुडुंब भरुन वाहत असल्याने वारणा नदीची पाणी पातळी वाढल्याने कोकरुड -रेठरे पुल पाण्याखाली गेला आहे. पाऊस सुरुच असल्याने पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. 


दरम्यान, कृष्णा नदीची पाणीपातळी पावसाअभावी घटत होती. दोन दिवसाच्या पावसाने पाणीपातळीत १ फुटाने वाढ झाली आहे. सांगलीच्या आयर्वित पुलाजवळ दोन दिवसांपूर्वी ३.९ फूट असणारी पाणीपातळी आता 6 फूटावर गेली आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या