Wardha Rain : वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. आर्वी तालुक्यात दोन दिवसापासून धुवाधार पाऊस बरसत आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळं आर्वीतील कन्नमवार नगरसह अनेक वार्डातील घरात पाणी शिरले आहे. तसेच गावातील रस्त्यांवर तीन ते चार फूट पाणी आहे. या पावसामुळं शेत शिवारात देखील पाणी साचलं आहे. आर्वी देउरवाडा मार्गावर नाल्यांची साफसफाई केली नसल्यानं मोठ्या प्रमाणात पाणी साचून देउरवाडा येथील 75 घरात पाणी शिरले आहे.
धान्यासह जीवन उपयोगी साहित्याचं नुकसान
देउरवाडा गावातील रस्त्यावर तीन ते चार फूट पाणी आहे. तसेच तेथील 75 घरात पाणी शिरल्यानं पहाटे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. या पाण्यामुळं अनेकांच्या घरातील धान्यासह जीवन उपयोगी साहित्यही भिजल्यानं मोठी नासाडी झाली आहे. नुकत्याच शेतकऱ्यांच्या पेरण्या आटोपल्या असून अंकुरलेल्या बियाण्यांकडे नजरा असतानाच जोरदार बरसलेल्या पावसाने शेतांचं अक्षरशः तळे बनले आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. संबंधित प्रशासनाला लक्ष देण्याची मागणी केली आहे. आर्वी तळगाव मार्गाचे काम रखडलेले आहे. या पावसामुळे वर्धमनेरी पुलावरुन पाणी गेल्यानं काही काळ वाहतूक ठप्प होती. शिरपूर गावात जाणाऱ्या बाकली पुलावरही पाणी साचल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती.
शेतशिवार बनले तळे,उगवण्याआधीच नासाडी
मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या. मात्र काही दिवसांपूर्वी वरुणराजाचे आगमन झाले आणि शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या होत्या. आर्वी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मौजा नांदपूर क्षेत्रातील मासोळीच्या नाल्यालगत असलेल्या बहुतांश शेतकऱ्यांचे पेरणी संपूर्णतः नष्ट झाल्यामुळं शासनाकडून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नांदपुर येथील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे .
पाऊस मोठ्या प्रमाणात आल्यामुळं बांधबंधिस्ती फोडून 127 ते 133 हेक्टर शेतीची पेरणी अंकुरण्याआधीच वाया गेली आहे. त्यामुळं शासनाने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.
घर कोसळले वृद्ध महिला थोडक्यात बचावली
शोभा मधुकर थोरात या वृद्ध महिला पहाटे झोपेत असताना काहीतरी पडण्याचा आवाज आला. त्यामुळं त्यांचा मुलगा मंगेशला जाग आली असता त्यांनी लगेच आई शोभा यांना बाहेर काढले. त्यानंतर लगेचच घर कोसळले. यामध्ये जवळजवळ एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तर मधुकर गवळी यांच्या घराचाही काही भाग कोसळला आहे.
आर्वी तळेगाव मार्गाचे काम रखडल्याने अनेक अडचणी :
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आर्वीकरांकडून विनंती करत आर्वी तळेगाव मार्ग सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली होती. कारण या मार्गाचे काम रखडल्यामुळे पावसाळ्यात दयनीय अवस्था होणार होती. त्यामुळे शेतकरी विद्यार्थी आणि रुग्णांचे देखील अतोनात हाल होणार होते. ही परिस्थिती लक्षात घेता परिस्थिती उद्भवण्याआधीच नागरिकांनी माजी आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वात आंदोलनही केलं होतं. मात्र, हे काम रखडलं असल्याने या पावसामुळे वर्धमनेरी पुलावरुन पाणी साचल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. शिरपूर गावात जाणाऱ्या बाकली पुलावरही पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.
शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्याने संबंधित कंत्राटदार यांना माहिती देण्यात आली आहे. तसेच पीडित नागरिकांची सोय जिल्हा परिषद शाळेत करण्यात आली आहे. मी प्रत्यक्ष तिथे भेट देऊन पाहणी केली असून शेतीच्या आणि घरातील झालेल्या नुकसानीचा अंदाज घेऊन सर्वे करणे सुरु आहे असे तहसीलदारांनी सांगितले.
जून महिन्यात उघडीप दिलेल्या पावसाचा जुलै महिन्यात चांगलाच जोर वाढला आहे. मागच्या दोन दिवसापासून राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यानं पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई आणि उपनगरासह कोकणातील सर्वच जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. कोकणात काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये देखील पावसाचा जोर वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतही पावसानं हजेरी लावली आहे.
महत्वाच्या बातम्या: