Anil Babar : शिवसेनेचेच सरकार असावं हे शिवसैनिकांची भावना होती. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी देखील शिवसेनेचे सरकार ठेवून शिवसैनिकांची भावना जपली. आता शिवसैनिकांमध्ये आणि आमच्यामध्ये जे काय मतभेद तयार झालेत त्यावर देखील कालांतराने मार्ग निघेल असे वक्तव्य खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांनी केलं आहे. नाराज शिवसैनिक पुन्हा आमच्यासोबत येतील असा विश्वास अनिल बाबर यांनी व्यक्त केला. जिल्ह्याच्या नशिबात मंत्रिपद असेल तर मिळून जाईल, असे म्हणत बाबर यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.
अडीच वर्षात काळात विकास खुंटला होता
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेले सांगली जिल्ह्यातील खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर हे मतदारसंघात परतले आहेत. त्यांनी आल्यानंतर लगेच मतदारसंघातील लोकांच्या भेटी घेण्याबरोबरच सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन मतदारसंघातील काही प्रश्नांच्या बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं हे सरकार लोकाभिमुख आहे. मागील अडीच वर्षात महाविकास आघाडीच्या काळात विकास खुंटला होता. पण आता शिंदे सरकारच्या काळात राज्याला पुढे नेण्याचा आणि राज्य विकासाच्या वाटेवर नेण्याचा आमचा प्रयत्न असेल असेही अनिल बाबर यांनी सांगतिले.
नशिबात असेल तर मंत्रिपद मिळून जाईल
मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्याने आता जिल्ह्यातील शिवसेना आणि भाजप आमदारांना मंत्रीपदाच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत. एकनाथ शिंदे गटाचे जिल्ह्यातील एकमेव आमदार असलेले अनिल बाबर यांना देखील मंत्रिपद देण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ आणि सुरेश खाडे यांना देखील मंत्रिपदाची आशा आहे. अनिल बाबर यांना यावेळी मंत्रिपद मिळणार का? हा प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, या गोष्टी ठरवणं आपल्या हातात नाही, मात्र जिल्ह्याच्या नशिबात मंत्रिपद असेल तर मिळून जाईल प्रतिक्रिया अशी बाबर यांनी दिली.
संवेदनशील काळातही अनिल बाबर यांनी सुरक्षा नाकारली
राज्यात गेल्या पंधरा दिवसात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. यामध्ये आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर केंद्र व राज्य सरकार या दोघांकडून आमदारांना सुरक्षा देण्याचा निर्णय झाला. परंतू आमदार अनिल बाबर आणि त्यांच्या कटुंबियांनी सर्व प्रकारे मिळणारी सुरक्षा नाकारली. या संवेदनशील काळातही सुरक्षा नाकारणारे ते एकमेव आमदार आहेत. आमदार अनिल बाबर यांनी आपल्याबरोबर शस्त्रधारी पोलीस सुरक्षारक्षक ठेवला नाही. परंतू गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून राजकारण अत्यंत संवेदनशील बनले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील काही आमदारांच्या कार्यालयावर व घरांवर हल्ले झाले होते. काही अनुचित घटना घडल्यानंतर केंद्राने प्रत्येक आमदाराला वाय दर्जाची सुरक्षा देणार असल्याचे सांगितले. सुप्रिम कोर्टासह राज्यपाल यांनीही राज्य सरकारला आमदारांना सुरक्षा देण्याविषयी सूचना केल्या होत्या. परंतू, आमदार बाबर आणि त्यांच्या कुटुंबियांनाही सुरक्षा नाकारली. आमदार बाबर यांच्या विटा येथील निवासस्थानी व कार्यालयाजवळ गेल्या पंधरा दिवसात देण्यात आलेली सुरक्षा ठेवू नये, अशी भूमिका आमदार बाबर यांनी घेतली आहे.