सांगली : कृषि व पणन विभागामार्फत बुधवारी सांगलीत बेदाणा परिषद तसेच सांगली बेदाणा, सांगली हळद भौगोलिक मानांकन अधिकृत वापरकर्ता नोंदणी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सांगली जिल्ह्यात द्राक्ष व हळद ही प्रामुख्याने दोन पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. त्याचबरोबर या दोन्ही पिकांचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा आहे.
सांगलीची द्राक्षे व हळद ही राष्ट्रीय स्तरावरची सांगलीची ओळख असल्याने या दोन्ही पिकांना भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. या भौगोलिक मानांकनात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करावी. यासाठी कृषि विभाग प्रयत्नशील असून येत्या वर्षभरात एक हजारापर्यंत शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येईल. यामुळे उच्च दर्जाचा बेदाणा व हळद जिल्ह्यात निर्माण होईल. त्यामुळे निर्यात वाढून शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल. जीआय मानांकनात नोंदणी केल्यानंतर पुढील करावयाच्या कार्यपध्दतीबाबत शेतकऱ्यांना तज्ज्ञांमार्फत योग्य मार्गदर्शन व्हावे, त्यांच्या शंकाचे निरसन व्हावे यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
भारतात प्रमुख बेदाणा उत्पादनात सांगली जिल्ह्याचा समावेश आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील एकूण बेदाणा उत्पादनापैकी 80 टक्के उत्पादन सांगली जिल्ह्यातून होते. सांगली जिल्ह्याचे द्राक्ष उत्पादनाखालील क्षेत्र 31 हजार 776 हेक्टर असून त्यापैकी 8 हजार 700 हेक्टर क्षेत्रावर बेदाणा तयारा होतो. सांगली जिल्ह्यामधून दरवर्षी 85 ते 90 हजार मेट्रीक टन बेदाणा उत्पादन होते. यापैकी 20 टक्क्यापर्यंत बेदाण्याची निर्यात होते.
सांगली बेदाण्याला प्रतिष्ठेचे भौगोलिक मानांकन (जी.आय. मानांकन) प्राप्त झाले असून या जी.आय. मानांकनात जिल्ह्यात आत्तापर्यंत 186 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. जी.आय. मानांकनात शेतकऱ्यांची नोंदणी वाढावी व निर्यातक्षम बेदाणा तयार होवून निर्यातीची टक्केवारी वाढावी यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. जी.आय. मानांकनाची प्रक्रिया शेतकऱ्यांना सुलभतेने समजावी यासाठी बेदाणा परिषद महत्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार वेताळ यांनी व्यक्त केली.
सांगली जिल्ह्याने गेल्या तीन वर्षात बेदाणा निर्यातीचा चढता आलेख राहिल्याने सांगली जिल्ह्याला बेदाण्याला निर्यातीसाठी फार मोठी संधी असल्याने या संधीचा शेतकऱ्यांसाठी अधिक फायदा होणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त मानांकन नोंदणी करून उच्च प्रतीचा निर्यातक्षम बेदाणा निर्माण करण्यावर भर द्यावा, असे आवाहन यावेळी कृषी विभागामार्फत करण्यात आले.
सांगली जिल्ह्याने गेल्या तीन वर्षात बेदाणा निर्यातीचा चढता आलेख
- सन 2019 मध्ये 16 हजार 144 मेट्रीक टन द्राक्षाचे उत्पादन झाले असून यामधील 80 मेट्रीक टन बेदाणा निर्यात
- सन 2020 मध्ये द्राक्षाचे उत्पन्न 17 हजार 480 मेट्रीक टन झाले तर 94 मेट्रीक टन बेदाणा निर्यात
- सन 2021 मध्ये 20 हजार 10 मेट्रीक टन द्राक्षाचे उत्पन्न झाले असून 170 मेट्रीक टन बेदाणा निर्यात
महत्वाच्या बातम्या :