नवी दिल्ली :  देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह उफाळण्याची पुन्हा शक्यता निर्माण झाली आहे. पंजाबमध्ये मुख्यमंत्री बदलानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये चलबिचल सुरु झाली असल्याचं दिसतंय. आपल्या पक्षाला राष्ट्रीय अध्यक्षच नाही, त्यामुळे हे असे निर्णय कोण घेतंय याची आपल्याला कल्पना नसल्याचं सांगत कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी अप्रत्यक्षपणे राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. कॉँग्रेसने लवकरात लवकर वर्किंग कमिटीची बैठक बोलवावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझादांनीही तशी मागणी केली आहे. 


काँग्रेस नेते कपिल सिब्बल म्हणाले की, "मी त्या काँग्रेस नेत्यांच्या वतीनं बोलत आहे ज्यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये वर्किंग कमिटी आणि सेंट्रल इलेक्शन कमिटीला पक्षाच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीसाठी पत्र लिहिलं होतं. त्या पत्राच्या उत्तराची आम्ही अजूनही वाट पाहतोय."


काँग्रेस नेते कपिल सिब्बल म्हणाले की, "निर्णयाची वाट पाहण्याची पण एक मर्यादा असते. आम्हाला कांग्रेस संघटना पुन्हा एकदा बळकट करायची आहे. देशातल्या आणि पंजाबच्या मुद्द्यावर काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत चर्चा व्हायला हवी. आपण कोणाविरोधात नसून केवळ पक्षासोबत आहोत. पण वस्तुस्थिती ही आहे की आपल्या पक्षाला राष्ट्रीय अध्यक्ष नाही."


 




काँग्रेस नेते कपिल सिब्बल म्हणाले की, आपण ज्या पक्षाचे सदस्य आहोत त्या पक्षाला एक गौरवशाली इतिहास आहे. सध्या पक्ष अनेक आव्हानांचा सामना करतोय. आज पक्षाची जी अवस्था आहे ती असायला नको होती. अनेकजण आपल्याला सोडून जात आहेत. सुष्मिता गेल्या, सिंधिया गेले, जितिन प्रसाद आणि सुधीरन गेले. मग प्रश्न हा आहे की हे लोक का सोडून जात आहेत. यावर तार्किक उत्तर हवं. याची चर्चा काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये होणं गरजेचं आहे. 


गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पक्षाच्या 23 जेष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घ्यावी अशी मागणी केली होती. या 23 नेत्यांमध्ये कपिल सिब्बल यांचा समावेश आहे. 


महत्वाच्या बातम्या :