पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडच्या महात्मा फुले महाविद्यालयात फी माफीसाठी विद्यार्थ्याने स्वतःचे डोके काचेवर आपटून घेतले. शिक्षकांनी आणि कर्मचाऱ्यांनी मला मारहाण केली आहे. असा आरोप विद्यार्थ्यांनी केला तर काही संघटनांनी एक व्हिडिओ देऊन तसा दावा आहे. पण महाविद्यालयाने सीसीटीव्ही पुढे करत हे आरोप फेटाळले आहेत. बुधवारी सकाळी हा प्रकार घडला. संबंधित विद्यार्थी प्राचार्यांना भेटायला गेला. पंधरा हजारांऐवजी माझ्याकडून आपण आठ हजार फी अकरावी अशी त्याची मागणी होती, अशी पिंपरी पोलिसांनी माहिती दिली. शुभम बारोठ असं त्या विद्यार्थ्याचं नाव आहे.


याबाबत तो प्राचार्यांशी संवाद साधत होता, त्यावेळी तो मोबाईलमध्ये चित्रीकरण करत असल्याचं महाविद्यालयाने दिलेल्या सीसीटीव्हीत दिसत आहे. त्यानंतर काही सेकंदाने मोबाईल खिशात घालून, त्याच कक्षात बसलेल्या इतरांशी तो काहीतरी बोलला अन् अचानक स्वतःच डोकं दाराच्या काचेवर आपटलं. दुसऱ्यांदा डोकं आपटलं, तेव्हा मात्र काच फुटली. हे सीसीटीव्ही समोर आणून संबंधित विद्यार्थ्याचे आरोप फेटाळले. 


विद्यार्थ्याने मात्र महाविद्यालयातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला. तर त्याच्या मदतीसाठी धावलेल्या संघटनांनी गोंधळाचा व्हिडीओ दिला. त्यात स्पष्टपणे काही दिसत नसलं तरी त्या व्हिडिओद्वारे विद्यार्थ्याला मारहाण झाल्याचा दावा त्यांनी केलाय. पिंपरी पोलिसांनी देखील सीसीटीव्हीचा आधार घेत, महाविद्यालयाकडून मारहाण झाली नसल्याचं म्हटलंय. 


प्राचार्य पांडुरंग गायकवाड यांनी म्हटलं की, त्या विद्यार्थ्यानं काचेवर डोकं आपटलं. त्यावेळी आमच्या शिपायाला देखील दुखापत झाली. हा प्रकार विद्यार्थी आणि शाळेच्या दृष्टीनं वाईट गोष्ट आहे. फी 50 टक्के माफ करण्याबाबत संस्थेशी बोलू. विद्यार्थ्याला मारहाण केल्याबाबत माहिती मिळाली आहे. तशी काही घटना घडली असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. त्याला मारहाण करणारे शाळेचे शिपाई असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं प्राचार्य म्हणाले. 


बुधवारचा अख्खा दिवस आरोप आणि खुलासे करण्यात गेला. विद्यार्थी आणि महाविद्यालायकडून दावे-प्रतिदावे अद्याप ही सुरू आहेत. पण मुख्य प्रश्न हा आहे की ज्या फी साठी हा वाद सुरू झालाय, त्या फी वरून राज्यात बहुतांश शाळा-महाविद्यालयात हाच संघर्ष पाहायला मिळतोय.