सांगली :  मिरज तालुक्यातील कसबे डीग्रज मधील कृष्णा साईमते यांच्या गजा बैलाचे अटॅकने निधन झालंय. गजा बैलाचे वय 10 वर्ष 6 महिने होते. काही दिवसांपासून तो आजारी होता. मात्र अटॅक आला आणि गजाने गोठ्यातच प्राण सोडला. यामुळे मागील दहा वर्षांपासून कृष्णा साइमते आणि गजाची जिगरी मैत्री तुटली. एक टन वजन, सहा फूट उंची आणि दहा फूट लांबी असा गजाचा आकार होता, त्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली होती. 


महाराष्ट्रसह कर्नाटकात अनेक कृषी प्रदर्शनात डंका केलेला  गजा बैल आज हयात नाही. गजा जग सोडून गेल्याचा साईमते कुटुंबाना मोठा धक्का बसलाय. गजाचा मालक कृष्णा साईमते धाय मोकलून रडतोय, कृष्णाची बहीण गजाच्या अंगावर डोकं ठेऊन रडतेय. कृष्णा आई आणि बायको पदरात तोंड घालून रडतायात. हे सारं रडणं आहे केवळ त्याच्या लाडक्या आणि जीवापाड जपलेल्या गज्यासाठी. कृष्णाची बहिणीला आपल्या भावाचा सखा गेल्याचे मोठं दुःख आहे, तरी कृष्णाच्या आईला आपल्या लेकाचा गजा गेल्याचं दुःख आहे. 


कृष्णा साईमतेने या गजासाठी काही कमी केलं नाही. खाणं-पिण्यात तर कधी कमी नाही. गजाच्या  खास बडदास्त बगा, गोठ्यात खास त्याच्यासाठी फॅन लावणारा त्याचा हा मालक होता. कृष्णा आणि गजा हे अतूट समीकरण बनलं होतं. केवळ गजाला वेगवेगळ्या कृषी प्रदर्शनात नेणं आणि त्याची देखभाल करणं हेच कृष्णापुढे महत्वाचे काम होतं. स्वतःच्या जिवापेक्षा कृष्णाने गजावर जीव लावला असं त्याची आई, बहीण, बायको धाय मोकलून सांगतेय.


कोरोनामुळे मागील दीड दोन वर्षात लॉकडाऊन आणि वेगवेगळ्या निर्बंधामुळे ना कुठे मोठी कृषी प्रदर्शन भरली ना कुठे गजाला आपला डंका वाजवण्याची संधी मिळाली. त्यामुळे गजाच्या माध्यमातून होणारी कमाई देखील या अलीकडच्या काही काळात बंद होती. तरी देखील गजाची देखभाल, त्याच्या खाण्या-पिण्यात त्याच्या मालकाने तसुभरही कमी ठेवली नव्हती. काही वर्षांपूर्वी एका पीक अप गाडी साठी कृष्णा यांनी कर्ज  घेतले होते. ते कर्ज देखील गजाला ठिकठिकाणी प्रदर्शनात नेऊन मिळणाऱ्या पैशातून फेडले होते. दुसरी आनंदाची बाब म्हणजे अगदी काही दिवसांपूर्वीच गजा बैलाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली होती. पण त्याचा आनंद साजरा करण्याची संधी काही गजा आणि त्याच्या मालकाला भेटली नाही. आता गजा गेला पण त्याच्या आठवणी कायमस्वरुपी राहाव्यात म्हणून कृष्णा साईमते यांनी गजाच्या शरीराचे जतन करण्याचा निर्णय घेतलाय. गजाच्या शरीराचे स्केलेटन करुन त्याच्या हाडाचा सापळा ठेवलाुजाणार आहे.


माणूस एखाद्या प्राण्यांवर किती अफाट प्रेम करु शकतो आणि तो प्राणी देखील त्या व्यक्तीच्या प्रेमाची कशापद्धतीने परतफेड करू शकतो हे कृष्णा साईमते आणि गजा बैलाच्या यारीकडे पाहिले की कल्पना येते.


महत्वाच्या बातम्या :