पंढरपूर : येत्या काही दिवसांमध्ये पंढरपूरमध्ये आषाढी कार्तिकीची यात्रा भरणार आहे. त्यामुळे कितीही निर्बंध असले तरी चार ते पाच हजार नागरिक बाहेरुन शहरात दाखल होतील. अशा पार्श्वभूमीवर सध्या पंढरपूरमध्ये कोरोना रुग्णसंख्या कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाहीय. परिणामी प्रशासनासोबत नागरिकांचीही चिंता वाढत आहेत. यातही पंढपूर तालुक्यातील ग्रामीण भागाला याचा मोठा फटका बसला आहे.


सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये बुधवारी नवीन 371 कोरोना रूग्ण आढळून आले असून यापैकी 117 एकट्या पंढरपूर तालुक्यातील आहेत. शहरात 10 तर ग्रामीण भागात 107 रूग्णांची नोंद झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण पंढरपूर तालुक्यात सापडले असून आजवर 25 हजार 744 जणांची नोंद आहे तर 503 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत. सध्या 374 जणांवर उपचार सुरू आहेत.


पंढरपूर तालुक्यात ग्रामीण भागात अजूनही कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. कोरोनावर उपचार घेत असलेल्या 374 पैकी 361 जण हे ग्रामीण भागातील आहेत तर 13 हे पंढरपूर शहरातील आहेत. आजवर ग्रामीण भागात 17 हजार 453 कोरोनाबाधित आढळून आले आहेत तर शहरात 8 हजार 291 जणांची नोंद आहे. बुधवारच्या अहवालानुसार 10 हजार 165 कोरोना चाचण्या जिल्हा ग्रामीणमध्ये झाल्या असून यापैकी 9 हजार 794 निगेटिव्ह आहेत. तर तीन जणांच्या मृत्यूची अहवालात नोंद आहे.


Ashadi Yatra | आषाढी यात्रेसाठी उद्यापासून पालख्यांचं प्रस्थान; भाजप अजूनही पायी वारीवर ठाम


कोरोना बळीचा आकडा पाचशे पार!
कोरोनाच्या पहिल्या व दुसर्‍या लाटेत सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये सर्वाधिक फटका हा पंढरपूर तालुक्याला बसला असून येथे या काळात 502 जणांना आपले प्राण या आजारात गमवावे लागले आहेत. हा तालुका कोरोनामुळे अनेक दिग्गजांना मुकला आहे. 


कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अजूनही संपलेला नाही. संभाव्य तिसर्‍या लाटेची शक्यता गृहित धरून उपाययोजना केल्या जात आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात या विषाणूने पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक थैमान घातल्याचे चित्र होते. पहिल्या व दुसर्‍या लाटेत मिळून पंढरपूर तालुक्यात 25 हजार 627 कोरोनाचे रूग्ण आढळून आले. यापैकी 502 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. या आजारावर मात करणार्‍यांची संख्या 24 हजार 784 इतकी असून मंगळवार 29 जूनच्या अहवालानुसार येथे अद्याप 341 जणांवर उपचार सुरू आहेत.


Ashadhi Wari 2021 : पायी वारीच्या परवानगीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल


सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये पंढरपूर तालुका हा कोरोना रूग्णांच्या बाबतीत अग्रेसर राहिला आहे. तसेच येथे सर्वाधिक मृत्यूंची ही नोंद आहे. पंढरपूर पाठोपाठ बार्शी तालुक्यात 455, माळशिरस 371, माढा 339, मोहोळ 331 असे कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत. पंढरपूर तालुक्याने अनेक दिग्गजांना कोरोनामुळे गमावले आहेत. यात राजकीय, आध्यात्मिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा समावेश आहे. येथील राजकीय क्षेत्राचे अतोनात नुकसान या आजाराने केले आहे. सुधाकरपंत परिचारक, आमदार भारत भालके, राजूबापू पाटील यांच्यासह भागवताचार्य वा.ना. उत्पात, रामदास महाराज जाधव यांच्यासह अनेकांना हा तालुका कोरोनामुळे मुकला आहे. पत्रकारिता क्षेत्रालाही याचा फटका बसला आहे.


कोरोनाच्या पहिल्या लाटेत पंढरपूर भागात सर्वाधिक रूग्ण होते तर दुसर्‍या लाटेच्या वेळीही येथील रूग्णसंख्या वाढतच गेली आहे. दिवंगत भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानसभेची पोटनिवडणूक झाली व यानंतर पंढरपूर व मंगळवेढ्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत खूप वाढ झाल्याचे दिसून आले. अद्यापही रूग्ण येथे सापडतच आहेत. पंढरपूर शहरातील कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात आली असून येथे केवळ दहा जणांवर उपचार सुरू आहेत. मात्र, ग्रामीण भागात कोरोनाचा अद्यापही पूर्णतः आटोक्यात आलेला नाही. ग्रामीण भागातील 331 जण या आजारावर उपचार घेत आहेत. पंढरपूर शहरात आजवर 8 हजार 281 तर ग्रामीणमध्ये 17 हजार 346 रूग्ण नोंदले गेले आहेत.