सांगली : सध्या देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे राज्यात अनेक गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले आहेत. अनेक सण-उत्सव गेल्यावर्षीप्रमाणे कोरोनाच्या सावटात पार पडत आहेत. अशातच आषाढी वारीदेखील कोरोना सावटात पार पडणार आहे. पायी वारी सोहळ्यासाठी वारकरी आग्रही आहेत. परंतु सरकारनं आषाढी वारीसाठी मोजक्याच आणि मानाच्याच पालख्यांना परवानगी दिली आहे. एवढंच नाहीतर पायी वारी सोहळा न करता, बसमधून पालख्या पंढरपुरात नेण्यात येणार आहेत. परंतु, तरिही पायी वारी सोहळ्याला परवानगी मिळवण्यासाठी काही वारकरी आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहे. पायी वारी सोहळ्याच्या परवानगीसाठी वारकऱ्यांकडून सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली होती. अशातच आता पायी वारी सोहळ्याच्या परवानगी द्यावी अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनीही केली आहे. 


"पंढरीची वारी झाल्यावर देशातील नव्हतेतर जगातील कोरोना आटोक्यात नाहीतर नामशेष होईल. संतांच्या परंपरा जपल्याने सगळी काही विघ्नं नाहीशी होतात. त्यामुळे पायी वारी करण्यास परवानगी द्यावी", अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे केली आहे. संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली वारकरी संप्रदायाचे प्रमुख आणि शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्त्यांनी सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांना निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली आहे. या बरोबरच मानाच्या पालख्यांचे वाहनातून प्रस्थान न करता मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत पायी वारी झाली पाहिजे, अशी मागणीही भिडे यांनी केली आहे.


"आपल्या सर्वांना कोरोनामुक्त हिंदुस्थान व्हावा असे वाटते. आणि ते होणार आहे. त्यामुळे पायी वारीला परवानगी द्यावी, अशी त्यांनी मागणी केली. यावेळी श्रीशिवप्रतिष्ठानच्यावतीने निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आलेल्या निवेदनात, आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर अशा पायी वार्‍या करणारे लाखो वारकरी आहेत. वर्षानुवर्षे ही परंपरा आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे वारीची परंपरा खंडीत झाली आहे. परंतु, यावर्षी पंढरीच्या वारीसाठी वारकरी उत्सुक होते. राज्यातील काही जिल्हे वगळता कोरोना संसर्ग कमी आहे. राज्यातील इतर सर्व राजकीय कार्यक्रम सुरु आहेत. या पार्श्वभुमीवर शासनाच्या सर्व नियमांचे पालन करुन वारकऱ्यांनी वारीमध्ये सहभागी होण्याचे मान्य केले होते. असे असताना चर्चेचे निमित्त करून केवळ शंभर जणांना घेऊन पालख्या निघाव्यात असे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र शंभर जणांची पायी वारीही अमान्य करून पुन्हा बसनेच संताच्या पादुका पंढरपूरपर्यंत नेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. हा शासनाकडून वारकर्‍यांचा विश्वासघात असून ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी शासनाचा विरोध झुगारुन पायीच वारी करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे फलटण येथे त्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. या वारकरी सांप्रदायकडून निषेध करण्यात येतो. पंढरपूर वारीची परंपरा खंडीत होवूनये यासाठी पायी दिंडीला परवानी देण्याचे या निवेदनात म्हटले आहे.


दरम्यान, संभाजी भिडे यांनी यापूर्वी मास्कबाबतही वादग्रस्त वक्तव्य केले होते. कोणत्या शहाण्याने हा मास्क लावण्याचा सिद्धांत काढला आहे?, सवालही त्यांनी उपस्थित केला होता. मास्क लावण्याची काही गरज नाही, हा सगळा मूर्खपणा आहे, असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरुन विविध स्तरांतून अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सातवा वेतन आयोगाच्या थकबाकीचा दुसरा हफ्ता लवकरच मिळणार