नागपूर: नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग अद्याप उद्धाटनाच्या प्रतिक्षेत आहे. असं असलं तरी या महामार्गावरून काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी भरधाव म्हणजे तब्बल 175 ते 200 किमी वेगाने गाडी चालवली आहे. अद्याप हा मार्ग सर्वसामान्यांसाठी खुला नसताना व्हीव्हीआयपी लोकांना त्या ठिकाणी प्रवेश कसा मिळतोय हा सवाल आता उपस्थित होत आहे. 


नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर उद्घाटनापूर्वी गाडी चालवून वैदर्भीय जनतेला आणि शेतकऱ्यांना या महामार्गाचा विदर्भातील उत्पादन मुंबईच्या बाजारापर्यंत नेण्यासाठी पुरेपूर वापर करण्याचं आवाहन काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी केलं आहे. देशमुख यांनी आज सकाळी नागपूर पासून वर्धा जिल्हापर्यंत समृद्धी महामार्गावर कार चालवली. सुमारे 175 ते 200 किलोमीटर प्रति तास या वेगाने गाडी चालवून आशिष देशमुख यांनी हा महामार्ग किती उत्कृष्ट आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला.


मात्र अजून शासनाकडून महामार्गाचे उद्घाटन झाले नसताना आणि महाविकास आघाडी सरकार 1 मे रोजी या महामार्गाचे उद्घाटन करण्याचे नियोजन करत असताना महाविकास आघाडी सरकारमधील एका पक्षाच्या नेत्याने या महामार्गावर गाडी चालवणे कितपत योग्य आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच जो महामार्ग अजूनही सामान्य वाहनचालक आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतमालासाठी खुला झालेला नाही, तिथे व्हीव्हीआयपी लोकांना प्रवेश कसा मिळतो हा प्रश्नही उपस्थित झाला आहे.


फडणवीस मुख्यमंत्री असताना भाजप सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा ठाकरे सरकारच्या कार्यकाळात पूर्ण होत आहे. महाराष्ट्र दिन अर्थात येत्या 1 मे रोजी समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होण्याची शक्यता आहे. मराठवाडा-विदर्भाच्या विकासाला आणि वाहतूक, दळणवळण, उद्योग, व्यापार यांना चालना देणारा तसेच असंख्य प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणारा प्रकल्प असल्याचं सांगितलं जातं.


महत्त्वाच्या बातम्या: