नागपूर : "कोणी कितीही प्रयत्न केले तरी समृद्धी महामार्गमधून माझं नाव मिटवू शकणार नाही. गेली वीस वर्षे ही संकल्पना माझ्या डोक्यात होती. जेव्हा राज्याचे जनतेने मुख्यमंत्री म्हणून संधी दिली तेव्हा तो महामार्ग बांधला," अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. "आज आनंद या गोष्टीचा आहे की तेव्हा समृद्धी महामार्गाला जे लोक विरोध करत होते आज तेच लोक श्रेय घेण्यासाठी उद्घाटनाची तयारी करत आहे," अशी कोपरखळीही फडणवीसांनी मारली. दरम्यान, समृद्धी महामार्गाचं उद्घाटन झालं तर आनंद होईल. मात्र त्याचं कार्य पूर्ण केल्यानंतर उद्घाटन केलं तर जास्त बरं होईल. कारण काम पूर्ण न करता उद्‍घाटन केल्यास समृद्धी महामार्गाचा महत्त्व कमी होईल, असंही फडणवीस म्हणाले.


माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा ठाकरे सरकारच्या कार्यकाळात पूर्ण होत आहे. महाराष्ट्र दिन अर्थात येत्या 1 मे रोजी समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होण्याची शक्यता आहे.


समृद्धी महामार्गाचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करावं : बावनकुळे 
"समृद्धी महामार्गाची संपूर्ण संकल्पना आणि अंमलबजावणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असून ठाकरे सरकारने समृद्धी महामार्गाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करावे," अशी मागणी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. "मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी शेकडो बैठका घेतल्या. प्रत्यक्ष निर्माण स्थळावरचे दौरे केले आणि वेळेत भूसंपादन केले. आता प्रकल्प वेळेत पूर्णत्वास येत आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला विनंती आहे की त्यांनी समृद्धी महामार्गाचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करावा असं बावनकुळे म्हणाले. कोणी कितीही श्रेय घेतले तरी महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेला माहित आहे की हा प्रकल्प कोणी केला आहे. आता सत्तेत आल्यानंतर श्रेय घेण्यासाठी धावपळ सुरु आहे. या सरकारला थोडीशीही माणुसकी उरली असेल तर त्यांनी समृद्धी महामार्गाचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करावं," असं बावनकुळे म्हणाले.



समृद्धी महामार्गाविषयी सर्वकाही


- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग


- मराठवाडा-विदर्भाच्या विकासाला आणि वाहतूक, दळणवळण, उद्योग, व्यापार यांना चालना देणारा तसेच असंख्य प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणारा प्रकल्प असल्याचं सांगितलं जातं.


- सध्या मुंबई ते नागपूर अंतर कापण्यास सुमारे 14 तास लागतात. जवळपास 812 किमी अंतर पडते. जर समृद्धी महामार्ग झाल्यास अंतर 700 किमी होईल आणि फक्त 8 तासात मुंबई ते नागपूर अंतर कापणे शक्य होईल. यासाठी देखरेख एजन्सी म्हणून एमएसआरडीसी (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) काम पाहणार आहे.


- समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई दरम्यान 12 जिल्ह्यातून जाणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे आणि मुंबई!


- जवळपास 26 तालुके आणि 392 गावांचा संबंध या समृद्धी महामार्गाशी येणार आहे.


- समृद्धी महामार्गामुळे काही राष्ट्रीय महामार्गही जोडले जाणार आहेत. यात NH3, NH6, NH7, NH69, NH204, NH211, NH50 यांचा समावेश होतो.


- महामार्गाची एकूण रुंदी 120 मीटर असणार आहे. प्रत्येक बाजूस चार-चार अशा आठ पदरी मार्गिका असणार आहेत. मध्य मार्गिका ही 22.5 मीटर आसणार आहे, जी आंतरराष्ट्रीय मानकांनुसार आहे.


- प्रस्तावित समृद्धी महामार्गावर वेग मर्यादा 150 किमी प्रति तास आहे. जर भविष्यात परत महामार्गात वाढ करायची झाल्यास ती तरतूद आताच करण्यात आली आहे. त्यामुळे जमिनीचे परत अधिग्रहण होणार नाही हे विशेष.


- महामार्गात हॉटेल्स, मॉल्स, दवाखाने इत्यादी उभारण्यात येणार आहे.


- जवळपास 50 पेक्षा जास्त उड्डाणपुल, 24 हून आधिक इंटरचेंजेस वे तसेच 5 बोगदे प्रस्तावित आहेत.


- हा महामार्ग खाजगी भागीदारीतून होणार असल्यामुळे टोलही पडणार आहे. टोल हा प्रवास केलेल्या अंतरावरच पडणार आणि तो स्वयंचलित असणार आहे


- युद्धजन्य परिस्थितीत अथवा नैसर्गिक आपत्ती दरम्यान महामार्गावर विमान उतरु शकेल असा रन वे असणार आहे.


- समृद्धी महामार्ग हा रोजगार निर्मितीचे महत्त्वाचे काम करणार आहे. तब्बल 25 लाख रोजगाराची संधी उपलब्ध होईल असा दावा आहे.


- या प्रकल्पासाठी तब्बल 50 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्यासाठी पन्नास हजार एकर जमीन लागणार आहे.


संबंधित बातम्या