नागपूर : मुंबईत मेट्रोच्या उद्घाटन कार्यक्रमात भाजप नेत्यांना निमंत्रण न दिल्याचा वाद शमला नसताना, आता समृद्धी महामार्गाच्या होऊ घातलेल्या उद्घाटन सोहळ्याबद्दल नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. "समृद्धी महामार्गाची संपूर्ण संकल्पना आणि अंमलबजावणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असून ठाकरे सरकारने समृद्धी महामार्गाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करावे," अशी मागणी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी शेकडो बैठका घेतल्या. प्रत्यक्ष निर्माण स्थळावरचे दौरे केले आणि वेळेत भूसंपादन केले. आता प्रकल्प वेळेत पूर्णत्वास येत आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला विनंती आहे की त्यांनी समृद्धी महामार्गाचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करावा असं बावनकुळे म्हणाले. कोणी कितीही श्रेय घेतले तरी महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेला माहित आहे की हा प्रकल्प कोणी केला आहे. आता सत्तेत आल्यानंतर श्रेय घेण्यासाठी धावपळ सुरु आहे. या सरकारला थोडीशीही माणुसकी उरली असेल तर त्यांनी समृद्धी महामार्गाचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करावं, असं बावनकुळे म्हणाले.
एकनाथ शिंदे यांनीही मंत्री म्हणून काम केले असले तरी या समृद्धी महामार्गाचा एकूणएक काम आणि व्हिजन देवेंद्र फडणवीस यांचं होतं. समृद्धी महामार्ग करावा हे पहिल्यांदा त्यांनाच सुचलं. ठाकरे सरकारचा मन लहान आहे, मनस्थितीही गेली आहे. मुंबईतील मेट्रो प्रकल्प रस्त्यांचे काम, समृद्धी महामार्गाचे काम फडणवीस सरकारने केले. मात्र, ठाकरे सरकार सूडबुद्धीने आणि कलुषित भावनेने वागत आहे. आमचा सरकार असतं तर आम्ही निश्चितपणे मागील मुख्यमंत्र्याला बोलावून त्यांना पुढाकार देऊन उद्घाटन केलं असतं. मात्र या सरकारला फडणवीसांचा तिटकारा आलेला आहे. फडणवीस यांनी विधानसभेत या सरकारचे भ्रष्टाचार उघडकीस आणल्यामुळे ते चिडले असल्याची प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली.
या लोकांनी प्रत्येक गोष्टीचा विरोध केला आहे. नाणार असो, कोस्टल रोड असो किंवा समृद्धी महामार्ग, सगळ्याला विरोध केला आणि आता मात्र आपलं नाव देऊन मोकळे होत आहेत. समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं, आमचा त्यास विरोध नाही. मात्र आता उद्घाटनाला देवेंद्र फडणवीस यांना बोलावून त्यांच्या हस्ते उद्घाटन करावं असं बावनकुळे म्हणाले.
संबंधित बातम्या
- Maharashtra Samruddhi Mahamarg : सरकारकडून तारीख पे तारीख! आता डेडलाईन 31 मार्चची, समृद्धी महामार्ग सुरु होणार कधी?
- समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्यायचं असेल तर राज्याला निम्मे पैसे द्यावे लागतील : रावसाहेब दानवे
- समृद्धी महामार्गाच्या कंत्राटदाराला दणका! 328 कोटींचा दंड भरावाच लागणार