Sambhaji Raje : संभाजीराजेंच्या 35 शब्दांनी सस्पेन्स वाढवला, शिवबंधन बांधणार की नाही, राजे म्हणाले, 'आमचं ठरलंय'!
Sambhaji Raje : संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेना पक्षप्रवेशाबाबत वक्तव्य केले असून त्यावरून आता चर्चा सुरू झाल्या आहेत.
Sambhaji Raje : राज्यसभेसाठी उत्सुक असलेले कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आपण याआधी सविस्तर चर्चा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे छत्रपतींचा सन्माम राखतील अशी अपेक्षा असल्याचे वक्तव्य संभाजी राजे यांनी म्हटले. संभाजीराजेंच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाबाबत आता पुन्हा उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
संभाजीराजेंनी सांगितले की, माझी मुख्यमंत्री उद्धवजींशी सविस्तर चर्चा झाली. सविस्तर बोलणं झालेलं आहे. पुढे काय करायचं ते सविस्तर ठरलेलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे ते त्याप्रमाणे करतील, मला हा ही विश्वास आहे की ते छत्रपती घराण्याचा सन्मान करतील असे वक्तव्य संभाजीराजे यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
संभाजीराजे छत्रपती यांनी पॅलेसमध्ये आज मालोजीराजे यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. संभाजीराजे आज मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. संभाजीराजे आजच मुंबईत दाखल होणार आहेत. संभाजीराजे छत्रपती यांनी सहावी जागा ही आपल्याला द्यावी, अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यानंतर चर्चेचा धुरळा उडाला. शिवसेनेने संभाजी राजेंनी पक्षात प्रवेश करावा त्यानंतर उमेदवारी जाहीर करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर संभाजीराजे यांच्यावर दबाव वाढला असल्याची चर्चा सुरू आहे.
शिवसेना आज सहावा उमेदवार जाहीर करणार?
शिवसेना राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात सहावा उमेदवार जाहीर करणार असल्याची शक्यता आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी पक्ष प्रवेश न केल्यास शिवसेनेने इतर उमेदवाराचीही तयारी केली आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून कोल्हापुरातील चेहऱ्याचा विचार सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्याही नावाची चर्चा आहे. संजय पवार हे मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय आहेत.
पाहा व्हिडिओ: संभाजीराजे म्हणाले, "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे छत्रपती घराण्याचा सन्मान करतील"