(Source: ECI/ABP News/ABP Majha)
घाबरल्यामुळे राज ठाकरे अयोध्येला गेले नाहीत ; अबू आझमींचा घणाघात
Abu Azmi : अबू आसिम आझमी यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यासह भाजपवरही टीका केली.
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) हे आता सर्जरीचे नाटक करत आहेत. खरं तर त्यांना रामानेच अयोध्येत येऊ दिले नाही. उत्तर प्रदेशमधील लोकांना राज ठाकरे यांनी त्रास दिलाय. त्यामुळे राम त्यांना अयोध्येत येऊ देत नाहीत. त्यांनी युपीवासियांची माफी मागावी. राज ठाकरे स्वतः खूप त्रस्त आहेत. ते घाबरले असल्यामुळे अयोध्येला गेले नाहीत, अशी टीका समाजवादी पक्षाचे नेते अबू आसिम आझमी (Abu Azmi) यांनी केली आहे.
अबू आसिम आझमी यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यासह भाजपवरही टीका केली. आझमी यांनी यावेळी राज ठाकरेंवरून राज्य सरकारवरही टीका केली. राज ठाकरे यांना राज्य सरकार अटक करत नाही. कारण त्यांना भीती वाटत आहे. राज ठाकरे ज्या मतदारांना उद्देशून हे करत आहेत तेच मतदार राज्य सरकार मधील काही पक्षांचे आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांना अटक करायला ते घाबरत आहेत, अशी टीका आझमी यांनी यावेळी केली.
अबू आझमी म्हणाले, "आम्ही सध्या महाराष्ट्रात संघर्ष करतोय. परंतु, आज देशाची वाईट परिस्थिती आहे. आज हिंदू- मुस्लिमच्या नावाने राजकारण सरू आहे. हे राजकारण करणारे निवडून देखील येतात. पण विकासाची भाषा करणाऱ्यांचा पराभव होतो. बाबरी मशिदीचा विषय चर्चेत आला. त्यानंत आता ज्ञानव्यापी मशीदीचा विषय पुढं आणला गेलाय. न्यायालयाने याचा सर्व्हे सुरु केला आणि सध्या बातम्या ही याच्याच सुरु आहेत. पंतप्रधानांच्या कानावर ही बाब टाकली आहे."
'उद्धव ठाकरेंनी हिंदुत्ववादी नव्हे सिक्युलर चेहरा घेऊन भाजपशी लढावे'
"आज मोठा हिंदुत्ववादी कोण आहे? हे ठरवण्याची स्पर्धा सुरू आहे. मतदानासाठी ही खेळी खेळली जात आहे. आमचा महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. हिंदुत्ववादी होऊन तुम्ही भाजपशी पंगा घेताय. सिक्युलर चेहरा घेऊन लढा. मुख्यमंत्र्यांना मी हे सांगू इच्छितो, असे आवाहन आझमी यांनी केले आहे.