मुंबई : मुंबई पोलिसात साधे एपीआय असलेल्या सचिन वाझेंकडे मर्सिडीज कार असल्याचं समोर आलं आहे. या संपूर्ण प्रकरणात मर्सिडीज, इनोव्हा, स्कार्पिओ अशा महागड्या गाड्यांचं कनेक्शन समोर आलं आहे. या प्रकरणात समोर आलेल्या या महागड्या गाड्यांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिस अधिकाऱ्यांच्या महागड्या गाड्यांबाबत गेल्याच महिन्यात केलेलं भाष्य आठवल्याशिवाय राहात नाही. 


सध्या सचिन वाझे वापरत असलेली मर्सिडीज कार एनआयएच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आहे. या मर्सिडीज कारमधून बॅग, डायरी, शर्ट आणि काही रक्कम जप्त करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. तसेच एनआयए अधिकाऱ्यांकडून या मर्सिडीज कारची कसून चौकशी सुरु आहे. 


या प्रकरणात मर्सिडीजसोबत इनोव्हा कार देखील चर्चेत आहे. या इनोव्हाचा वापर ठाण्याहून मुंबईत मुकेश अंबानींच्या निवासस्थानाकडे आणि पुन्हा ठाणे असा एकाच रात्रीत झाला असल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे वारंवार गाडीची नंबरप्लेट बदलल्याचं देखील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून समोर आलं आहे.  संशयाच्या घेऱ्यात असलेल्या नंबर प्लेट असलेली इनोव्हा कार दोन वेळा मुंबई पोलिस कमिशनर ऑफिसमधून निघाली असल्याचंही समोर आलं आहे.   


पोलिस अधिकाऱ्यांच्या महागड्या गाड्या पाहून अजित पवार अवाक्, म्हणाले...


तर या प्रकरणाचं मूळ असलेली स्कार्पिओ गाडी जी अंबानींच्या अॅंटीलियाजवळ 20 जिलेटिन कांड्यासह ठेवण्यात आली होती. जिथून हे प्रकरण सुरु झालं. नंतर या गाडीचे मालक असलेल्या मनसुख हिरण यांचा मृतदेह संशयास्पद रित्या मुंब्य्राच्या खाडीत आढळला.


या प्रकरणात समोर आलेल्या या महागड्या गाड्यांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिस अधिकाऱ्यांच्या महागड्या गाड्यांबाबत केलेलं भाष्य आठवल्याशिवाय राहात नाही. एका महिन्यापूर्वीच अजित पवार नेहमीच यांनी पोलिसांना मिळणाऱ्या महागड्या गाड्यांबाबत भाष्य केलं होतं. पुण्यात बोलताना अजित पवार म्हणाले होते की, मुंबईत असताना मला काही पोलिस अधिकारी भेटण्यास आले, त्यावेळी त्यांच्याकडे असलेल्या गाड्या पाहिल्या असता त्याची किंमत 35 लाख रुपये असल्याचे समजले. याबाबत चौकशी केली असता समजले की, उद्योगपतीने अशा महागड्या गाड्या पोलिसांना दिल्या.


Exclusive : ...म्हणून सचिन वाझेंना अटक, इनोव्हाच्या नंबर प्लेटचा झोल? CCTVमधून महत्वाची माहिती 


अजित पवार म्हणाले होते की, सरकारी नोकरी करणाऱ्यांनी कुणी कशी वाहने वापरावी याबाबत नियमावली आहे. पोलिस शासनाचे कर्मचारी असून उद्योगपतींनी दिलेल्या महागड्या गाड्या सरकारी नोकरी करताना वापरणे हे चुकीचे आहे. गृहमंत्री कोणते वाहने वापरतात आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी कोणत्या वाहनाने फिरतात याकडे जनतेचे लक्ष असते असेही अजित पवार यावेळी म्हणाले होते.