पुणे : आपल्या बेधडक शैलीमुळं आणि स्पष्टवक्तेपणामुळं उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच चर्चेत असतात. आपल्या शैलीत कुणाचाही थेट समाचार घेत असतात. आता त्यांनी पोलिसांना मिळणाऱ्या महागड्या गाड्यांबाबत भाष्य केलं आहे. पुण्यात बोलताना अजित पवार म्हणाले की, मुंबईत असताना मला काही पोलिस अधिकारी भेटण्यास आले, त्यावेळी त्यांच्याकडे असलेल्या गाड्या पाहिल्या असता त्याची किंमत 35 लाख रुपये असल्याचे समजले. याबाबत चौकशी केली असता समजले की, उद्योगपतीने अशा महागड्या गाड्या पोलिसांना दिल्या, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील पोलिसांच्या कार्यक्रमात सांगितले.


यावेळी अजित पवार म्हणाले की, सरकारी नोकरी करणाऱ्यांनी कुणी कशी वाहने वापरावी याबाबत नियमावली आहे. पोलिस शासनाचे कर्मचारी असून उद्योगपतींनी दिलेल्या महागड्या गाड्या सरकारी नोकरी करताना वापरणे हे चुकीचे आहे. गृहमंत्री कोणते वाहने वापरतात आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी कोणत्या वाहनाने फिरतात याकडे जनतेचे लक्ष असते. पोलिसांना लागणाऱ्या पायाभूत सुविधा देण्याचा शासन प्रयत्न करत आहे. पोलिसांच्या घरांचे काम सरकार प्राधान्याने करत असून त्यासाठी निधीही देत आहे. जादा एफएसआय आणि चांगल्याप्रकारचे दर्जेदार घर देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.


'अजितदादांची डोळ्यांची भाषा शिकणार, गॉगल घातला तरी...!' मुख्यमंत्री ठाकरेंची कोटी अन् हशा


सामान्य लोकांना पोलिसांचा आधार वाटला पाहिजे
काल पुण्यात अजित पवारांचा अनुकंपा तत्वावरील भरतीचा कार्यक्रम झाला. यावेळी अजित पवार म्हणाले की, आपल्या हद्दीत गुन्हा होणार नाही याची दक्षता पोलिसांनी घ्यावी. आपापल्या हद्दीत रात्रगस्त वाढवावी. यावेळी गजानन मारणे प्रकरणाविषयी बोलताना ते म्हणाले की, या प्रकरणात संबंधित पोलिसांनी असं वागायला नको होतं. ते का घडलं याची कारणे शोधायला हवीत. त्यांच्या अशा वागण्याने संपूर्ण पोलीस दलाची प्रतिमा खराब होते. एखादा गुंड तुरुंगातून सुटल्यानंतर मिरवणूक काढतो. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. शहराच्या दृष्टीने असे होणे बरोबर नाही. पोलिसांनी याविषयी दक्षता घेणे गरजेचे आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक असला पाहिजे. सामान्य लोकांना पोलिसांचा आधार वाटला पाहिजे. याची दक्षता पोलिसांनी घेणे गरजेचे आहे, असं देखील अजित पवार म्हणाले.