मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून सुरु असणारं कोरोनाचं थैमान काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही आहे. सातत्यानं वाढणारी रुग्णसंख्या पाहता प्रशासनापुढे अनेक अडचणी आल्या. ज्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंधही लागू करण्यात आले आहेत. 


राज्याच्या आरोग्य विभागानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार मंगळवारी दिवसभरात राज्यात एकूण 9510 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जे पाहता आतापर्यंत राज्यात एकूण 21,54,253 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचा आकडा पाहता राज्यातील कोरोनामुक्त होणाऱ्यांचं प्रमाण (Recovery Rate) 91.77 टक्के इतकं झालं आहे. 


सोमवारी नव्यानं आढळलेल्या कोरोनाबाधितांचा आकडा तुलनेने मोठाच होता. मंगळवारी राज्यात 17,864 नव्या रुग्णांचं निदान झालं. तर दिवसभरात 87 कोरोना बाधित रुग्णाांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. कोरोनामुळं मृत्यू होणाऱ्यांचा आकडा पाहता सध्या राज्यातील मृत्यूदर 2.26 टक्के इतका आहे. 


रेल्वेचं खासगीकरण होणार, रेल्वे मंत्र्यांनी दिलं या प्रश्नाचं उत्तर 


आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत तपासणी करण्यात आलेल्या 1,77,15,522 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 23,47,358 नमुने पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. 


राज्यातील कोरोनाचं संकट अद्यापही कमी झालेलं नाही. अद्यापही राज्यात 6,52,531 रुग्ण होमक्वारांटाईन अर्थात गृहविलगीकरणामध्ये आहेत. तर 6067 रुग्ण अद्यापही संस्थातमक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 1,38,813 सक्रिय कोरोनाबाधित आहेत. त्यामुळं आता सक्रिय रुग्णसंख्येसोबतच नव्यानं लागण होणाऱ्या कोरोना रुग्णांचा आकडा नियंत्रणात आणणं हे मोठं आवाहन राज्याच्या आरोग्य विभागापुढं असणार आहे.