'ज्यांनी खादाडासारखे खाल्ले, त्यांनाच अपचन झालेय', भाजपचं शिवसेनेला प्रत्युत्तर
सामनाच्या अग्रलेखातून (Saamana Shivsena article) भाजपवर जहरी टीका करण्यात आली आहे. यात भाजपसह राज्यपालांवर देखील निशाणा साधण्यात आला आहे. या टीकेला भाजपकडून देखील जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. भाजप नेत्यांनी संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडलं असल्याचं म्हटलं आहे.
मुंबई : शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना आलेल्या ईडीच्या नोटिशीनंतर वातावरण चांगलंच तापलं आहे. सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर जहरी टीका करण्यात आली आहे. या टीकेला भाजपकडून देखील जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. भाजप नेत्यांनी संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडलं आहे. ज्यांनी खादाडासारखे खाल्ले, त्यांनाच अपचन झालेय, अशा शब्दात टीका केली आहे.
राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडलं - भातखळकर सामना अग्रलेखावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे की, संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडलं आहे. संजय राऊत आणि भाजपाची चिंता करू नये. काँग्रेस शिवसेनेच्या पार्श्वभागावर रोज लाथा मारतंय त्याची चिंता राऊतांनी करावी, असं भातखळकर यांनी म्हटलं आहे. सामना आता वृत्तपत्र राहिलं नाही तर हँडबिल आहे. संविधानाची भाषा करणाऱ्या राऊतांना एक ईडीची नोटीस आली तर भीती का वाटते.? असा सवाल भाजप आमदार राम कदमांनी केला आहे.
एवढी तणतण कशासाठी - शेलार तर भाजप आमदार आशिष शेलार यांनी देखील ट्वीट करत शिवसेनेवर टीका केली आहे. शेलार यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, प्रभादेवीच्या गल्लीत बसून वर्षानुवर्षे दुसऱ्यांच्या टोप्या बेमालूमपणे उडवणारे आता एवढी का तणतण करत आहेत? निर्दोष असल्याचा कांगावा का करावा लागतोय? गाव का गोळा करावा लागतोय? ज्यांनी खादाडासारखे खाल्ले, त्यांनाच अपचन झालेय,तेच फुसकी हवा सोडून दुर्गंधी करत आहेत. चला हवा येऊ द्या!, असं आशिष शेलार यांनी म्हटलंय. तर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे की, विश्वासघातानं सत्तेवर येता येतं पण सत्ता चालवण्यासाठी क्षमता लागते. शिवसेनेने वर्षभरात काहीही केलं नाही. किमान लोकहिताची कामं करा, असं उपाध्ये यांनी म्हटलंय.
'शेण खाऊन नाचण्याचा अधिकार तुम्हाला कोणत्या घटनेने दिला?', 'सामना'तून भाजपवर जहरी टीका
'सामना'तून भाजपवर जहरी टीका सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे की, सीबीआय, ईडीसारख्या संस्थांचे अधःपतन सध्या जोरात सुरू आहे; पण यावर भाजपचे म्हणणे असे की, काँग्रेसच्या काळात ईडीचा गैरवापर झाला नाही काय? व्वा! काय म्हणायचे या अक्कलशून्य मंडळींना! काँग्रेसने कधीकाळी चुकीचे वर्तन केले म्हणून आम्हालाही अंगास शेण फासण्याचा व शेण खाऊन थयथयाट करण्याचा अधिकार आहे असेच ते म्हणतात. मग हा शेण खाऊन नाचण्याचा अधिकार तुम्हाला कोणत्या घटनेने दिला? असा सवाल अग्रलेखातून शिवसेनेनं केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटनाच बदलून तुम्ही ईडी कार्यालयात बसून नवी घटना लिहून काढलीत? हवाबाण थेरपीचा अतिरेक झाला की, मेंदूत सडकी हवा जाते. त्या पादऱ्या हवेच्या ढेकरा सध्या ज्यांना लागत आहेत त्यांचे नाव भाजप! भाजपच्या 'नव्या घटना समिती'चा विजय असो! डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण! हेच तुमचे भविष्य!, असं म्हणत जहरी टीका भाजपवर केली आहे.
भाजपविरोधकांना नमविण्याचे प्रयोग सुरू सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे की, सध्या महाराष्ट्रात 'ईडी' प्रकरण गाजत आहे. महाराष्ट्रातून भाजपची इडा-पीडा गेल्यापासून हे 'ईडी' प्रकरण जोर धरू लागले आहे. म्हणजे ईडीचा वापर करून भाजपविरोधकांना नमविण्याचे प्रयोग सुरू झाले आहेत. याच वातावरणाचा लाभ घेत ईडीस घाबरून भाजपच्या कळपात शिरलेल्या एका 'महात्म्या'ने 'ठाकरे सरकार' पडण्याचा नवा मुहूर्त दिला आहे. आता म्हणे मार्च महिन्यात काही झाले तरी सरकार पडणार! हा मुहूर्त यांनी 'ईडी पिडी'च्या पंचांगातून काढला की त्यांना झोपेत दृष्टांत झाला? एक मात्र खरे, महाराष्ट्रातील भाजपावाले सत्ता स्थापनेसाठी त्या ईडीवर फारच विसंबून राहिले आहेत, असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.