Ukraine-Russia War :  युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतलाय. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी चार केंद्रीय मंत्री युक्रेनच्या शेजारी देशांमध्ये जाणार आहेत. यामध्ये ज्योतिरादित्य शिंदे, हरदीप सिंग पुरी, किरण रिजीजू आणि व्ही.के.सिंग या मंत्र्यांचा समावेश आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या घरवापसीबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत चार मंत्र्यांना युक्रेनच्या शेजारी देशात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. हे मंत्री नागरिक आणि विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी समन्वय ठेवतील अशी माहिती मिळाली आहे. आतापर्यंत पाच विमानांमधून 1 हजार 156 भारतीयांची युक्रेनमधून घरवापसी झाली आहे. 


बेलारुस सीमेवर सध्या रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांच्या शिष्टमंडळाची बैठक सुरु आहे. युक्रेनकडून लवकरात लवकरच समेटीची अपेक्षा आहे असं वक्तव्य रशियानं केलंय. दुसरीकडे या बैठकीआधी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचं मोठं वक्तव्य आलंय. रशियानं तातडीने शस्त्रसंधी करावी अशी मागणी झेलेन्स्की यांनी केलीय. युक्रेनमधून रशियन फौजांना हटवण्याची मागणीही त्यांनी केलीय. त्यामुळे आता बेलारुसमध्ये होणाऱ्या बैठकीत काय होणार? रशिया-युक्रेन युद्ध संपणार का याकडं जगाचं लक्ष लागलंय. 


4,300 रशियन सैनिकांचा मृत्यू


रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत 116 मुलांसह 1684 लोक जखमी झाल्याचा दावा युक्रेनने केला आहे. मात्र, आतापर्यंत किती जवान शहीद झाले आहेत, हे मंत्रालयाकडून सांगण्यात आलेले नाही. युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान युक्रेनने दावा केला आहे की, या लढाईत आतापर्यंत सुमारे 4,300 रशियन सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 146 रणगाडे, 27 विमाने आणि 26 हेलिकॉप्टर नष्ट करण्यात आले आहेत.


महत्त्वाच्या बातम्या: