Russia Ukraine War : गुरूवारी रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. त्यानंतर सुरू झालेल्या युद्धामुळे दोन्ही देशांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही देशातील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम जगभरातील इतर देशांवरही होत आहे. भारतातील अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. यातीलच पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथील रहिवासी असलेल्या रामू रामदुलारे चव्हाण यांचा मुलगा सत्यम चव्हाण याने युक्रेनमधील परिस्थिती सांगितली आहे.
सत्यम हा एमबीबीएसच्या शिक्षणासाठी 2017 मध्ये युक्रेनमध्ये गेला आहे. सध्या तो एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थितीत तो अडकला असून गेल्या कित्येक दिवसांपासून सत्यमचे कुटुंबीय तणावात आहेत. त्याला भारतात आणण्यासाठी धडपड करत आहेत. मात्र, युक्रेनमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून खाण्यापिण्यासोबतच, राहणं आणि नेटवर्कचीही अडचण निर्णान झाली आहे. सत्यम ज्या अपार्टमेंटमध्ये राहण्यास आहे, तेथील लोकही सध्या युद्धाच्या दहशतीखाली आहेत. युक्रेनमध्ये कधीही आणि कुठेही बॉम्ब पडू शकतो, अशी भीती सत्यमकडून व्यक्त करण्यात आली आहे.
भारताच्या तुलनेत युक्रेनमध्ये केवळ 30 टक्के खर्चात वैद्यकीय शिक्षण मिळत असल्याने सत्यम युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेला आहे. त्याच्यासोबत मध्यप्रदेश आणि भारतातील आणखी दोघेजण एका अपार्टमेंटमध्ये अडकले आहेत. हे विद्यार्थी त्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात असले तरी त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु, सत्यमच्या कुटुंबीयांशी स्थानिक जिल्हा प्रशासनाने अद्याप संपर्क केलेला नाही, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. त्यामुळे परराष्ट्र मंत्रालयाने विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी त्याचे कुटूंबीय करत आहेत.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडूनही विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि त्यांना परत आणण्याच्या प्रक्रियेतील प्रगतीविषयी अद्याप तरी माहिती दिली जात नसल्याचे विद्यार्थ्यांच्या नातेवाइकांनी सांगितले. परंतु, पालघर जिल्हा प्रशासनाकडून शुक्रवारी सकाळी माहिती काळविण्याचे आदेश जारी केले आहेत.
"युक्रेनमध्ये मी आणि माझे दोन मित्र एका अपार्टमेंटमध्ये थांबलो आहोत. युक्रेन प्रशासनाकडून आम्हला वेळोवेळी सूचना दिल्या जात आहेत. बॉम्ब शेल्टर (बंकर) मध्ये आम्हला जाण्यास सांगण्यात येत आहे. परंतु, बॉम्ब शेल्टर(बंकर) मध्ये मोबाईल नेटवर्क आणि खाण्या-पिण्याच्या अडचणी आहेत. आम्ही सुरक्षित असलो तरी आम्हाला भारतात परत यायचे आहे, अशा भावना सत्यम याने व्यक्त केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- Russia Ukraine War : रशिया युक्रेनसोबत चर्चेसाठी तयार, शिष्टमंडळ पाठवणार
- Russia Ukraine War : रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांचं मोठं वक्तव्य, युक्रेनशी चर्चेला तयार, पण...
- Russia Ukraine War : रशियाने ब्रिटनशी घेतला बदला, सर्व ब्रिटीश विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद केले
- Russia-Ukraine Conflict : भारत सरकारचं मिशन एअरलिफ्ट, AIR INDIA चे दोन विशेष विमान तयार ठेवण्याचे आदेश