अमरावती: पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज जिल्ह्यातील पाणी टंचाई बाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा देखील उपस्थित होते. बैठकी दरम्यान अधिकाऱ्यांकडून कामाची माहिती घेत असतांना एक अधिकारी उशिरा पोचले. त्यावर पालकमंत्री ठाकूर यांनी संबंधित अधिकाऱ्याला सौम्य शब्दांत झापले. मात्र, त्यांच्या वक्तव्याचा रोख हा शेजारी बसलेल्या आमदार रवी रणांकडेच होता.


उशिरा आलेल्या अधिकाऱ्यांना बोलत असताना पालकमंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या की, "या साहेब, आरती आणा रे आरती. आम्ही शाई फेकणारी माणसं नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका". पालकमंत्री जरी अधिकाऱ्याला उद्देशून बोलल्या असल्या तरी त्यांचा रोख मात्र आमदार रवी राणांकडे होता. नुकतेच मनपा आयुक्तांवर झालेल्या शाइफेक प्रकरणामुळे शहरातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री ठाकूर यांनी आमदार रवी राणांना आज टोला लगावला.


अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांच्यातील राजकीय वैर हे सर्वश्रुत आहे. मागील काही दिवसांत जिल्ह्यात घडलेल्या घटनांमुळे या दोघांमधून विस्तवही जात नाही. मात्र आज हे दोन्ही राजकीय नेते एकाच ठिकाणी दिसून आल्याने चर्चांना उधाण आले होते. दोन्ही नेते एकत्र येण्याचं निमित्त होतं ते म्हणजे जिल्ह्यातील पाणी टंचाई बाबत झालेली आढावा बैठक. 


जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवनात ही आढावा बैठक पार पडली. मात्र अर्धा तास एकमेकांच्या बाजूला बसले असूनही या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना ढुंकूनही पाहिले नाही. एकीकडे पालकमंत्री यशोमती ठाकूर या नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचं निराकरण करीत होत्या तर दुसरीकडे आमदार रवी राणा हे अगदी शांतपणे बसून होते. एरवी शासकीय बैठकांमध्ये आक्रमक भूमिका घेऊन आपले मुद्दे मांडणारे रवी राणा आज मात्र अगदीच गप्प बसले असल्याने सभागृहात आश्चर्य व्यक्त होत होते.


महत्त्वाच्या बातम्या: