मुंबई : हौसेला मोल नसतं, असं नेहमी म्हटलं जातं आणि हे काहीसं खरं देखील आहे. कारण दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या व्हीआयपी नंबरसाठी अनेक हौशी लोक लाखो रुपये मोजत असल्याचं समोर आलं आहे. कारण राज्यभरात आरटीओला गेल्या ८ महिन्यात व्हीआयपी नंबर्सच्या मागणीतून तब्बल ७७ कोटींच उत्पन्न मिळालं आहे.
व्हीआयपी नंबर्सच्या मागणीत राज्यात पुणे अग्रेरस असून, पुणे आरटीओनं ३० हजार ३६६ व्हीआयपी नंबर्सच्या विक्रीतून जवळपास २३ कोटींचं उत्पन्न मिळवलं आहे. त्यापाठोपाठ नाशिक आरटीओनं १९ कोटी, ठाणे आरटीओनं १० कोटी, कोल्हापूर आरटीओनं ७ कोटींचं उत्पन्न मिळवलं आहे.
तर मुंबईमध्ये अंधेरी, बोरीवली, वडाळा आणि ताडदेव आरटीओनं ६ हजार ६५२ वाहनांची विक्री केली असून, त्यातून जवळपास ६ कोटींची कमाई केली आहे. चारचाकी वाहनासाठी १ हा नंबर सर्वाधिक १२ लाख रुपयांना विकला गेला असल्याची माहिती आरटीओनं दिली आहे.
दरम्यान, व्हीआयपी नंबरची क्रेज ही उत्तर भारतात जास्त असल्याची माहिती एका आरटीओ अधिकाऱ्यानं दिली आहे. 2012मध्ये पंजाबमध्ये काही व्हीआयपी नंबरसाठी अक्षरश: लिलाव झाला होता. ज्यामध्ये लाखो रुपये मोजून व्हीआयपी नंबर काही जणांनी मिळवले होते. तर चंदीगढमध्ये एका उद्योजकानं आपल्या चारचाकीसाठी 1 हा नंबर तब्बल 17 लाख रुपये मोजून मिळवला होता.
चारचाकीसोबत दुचाकीच्या व्हीआयपी नंबरसाठीही बरीच मागणी आहे. त्यासाठी हजारो रुपये मोजण्याचीही अनेकांची तयारी असते.