मालवण (सिंधुदुर्ग) : कोकण किनारपट्टीवर चार दिवसांपूर्वी धडकलेल्या ओखी वादळानं किनारपट्टीचं कोट्यवधी नुकसान झालं आहे. पण मच्छिमारांनी पुन्हा नव्या उमेदीने मच्छिमारीस प्रारंभ केला आहे.


याचदरम्यान मालवण किनारपट्टीवर मात्र तारली मच्छीचा अक्षरश: खच पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात तारली मच्छी किनाऱ्यावर आढळून आली आहे. मोठ्या प्रमाणात तारली मासळी किनाऱ्यालगत लाटांसोबत येत असल्याने तिला पाहण्यासाठी आणि पकडण्यासाठी स्थानिकांनी बरीच गर्दी केली होती. तब्बल 60 ते 70 टन मच्छी किनाऱ्यावर सापडली आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात मासळी आढळून आल्यानं मच्छिमारांमध्येही समाधानाचं वातावरण आहे. ओखी वादळानंतर जवळजवळ आठवडाभर बंद असलेली मासेमारी गेल्या दोन दिवसांपासून पूर्ववत होऊ लागली आहे. याच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात मासे सापडल्यानं मच्छिमारांचा आनंद दुणावला आहे.

लाटांसोबत वाहून येणारी मासळी पकडण्यासाठी स्थानिक मच्छिमारांनी किनाऱ्याजवळच जाळ्या लावल्या. तरीही वाहून जाणाऱ्या मासळीचा खच किनारपट्टीवर पसरला होता.

मालवणसह संपूर्ण सिंधुदुर्ग किनारपट्टीवर सध्या मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वर्दळ पाहायला मिळत आहे. हिवाळ्यात पर्यटनासाठी सिंधुदुर्गला अनेकजण पसंती देतात. त्यामुळे मालवण, भोगवे, निवती, वेंगुर्ले, देवबाग, तारकर्ली यासारख्या अनेक समुद्रकिनारी पर्यटक गर्दी करतात. याच दरम्यान, पर्यटकांना एवढ्या मोठ्या प्रत्यक्षात मासळी पकडण्याची सुवर्णसंधीही मिळाली.

‘ओखी’मुळे मोठ्या प्रमाणात तारली किनाऱ्यावर

‘ओखी’ वादळच्या परिणामाने समुद्राच्या हालचाली बदलल्या आणि त्यामुळेच तारली सारखे मासे किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात आली. असा अंदाज जुने-जाणते मच्छिमार व्यक्त करत आहेत.

ओखी वादळानं सिंधुदुर्ग, रत्नागिरीला जिल्ह्यातील किनारपट्टी भागाचं नुकसान

ओखी वादळाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मालवण, वेंगुर्ले, देवगड समुद्र किनाऱ्यावर तडाखा बसला होता. यामुळे किनाऱ्याजवळील मच्छिमारांच्या होड्या आणि जाळ्यांचे बरेच नुकसानही झाले होते. तसंच

ओखीमुळे रत्नागिरीतही अनेक किनारपट्टीच्या भागात समुद्राचं पाणी किनाऱ्याच्या भागात घुसलं होतं. त्यामुळे येथील किनारपट्टीवरच्या गावांचंही बरंच नुकसान झालं.

संबंधित बातम्या :

'ओखी'च्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, रायगडमध्ये शाळांना सुट्टी

मुंबईसह महाराष्ट्राच्या किनारपट्टीला ओखी वादळाचा इशारा

कोकण किनारपट्टीला ओखी वादळाचा फटका, समुद्राला उधाण

मालवणच्या समुद्रात पोलिसांची गस्तीनौका बुडाली