(Source: Poll of Polls)
Dinesh Lad On Majha Katta : मुलांना क्रिकेटपटू घडवायचं आहे? रोहित शर्माचे कोच दिनेश लाड यांनी दिला मोलाचा सल्ला
Dinesh Lad On Majha Katta : मुलांच्या खेळात पालकांचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणावर वाढला असून प्रत्येक खेळाडू आपल्या गुणवत्तेनुसार घडत असल्याचे क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांनी म्हटले.
Dinesh Lad On Majha Katta : पालक क्रिकेटपटू घडवू शकत नाही..खेळाडू स्वत: घडतात. पालकांनी मुलांच्या खेळात हस्तक्षेप करणे टाळले पाहिजे असे परखड मत द्रोणाचार्य पुरस्कार विजेते दिनेश लाड (Dinesh Lad) व्यक्त केले. भारतीय क्रिकेट संघातील रोहित शर्मा (Rohit Sharma), शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) यांच्यासारख्या क्रिकेटपटूंना घडवण्यात दिनेश लाड यांचा मोठा वाटा आहे. रोहित, शार्दुल यांच्यातील गुणवत्ता त्यांनी शालेय वयातच कळाली होती. दिनेश लाड यांनी 'माझा कट्टा'वर आपल्या क्रिकेट प्रशिक्षकाच्या वाटचालीबाबत भाष्य करताना अनेक अनुभव प्रेक्षकांना सांगितले. येत्या काही महिन्यात दिनेश लाड आणखी काही होतकरू खेळाडूंना 'दत्तक' घेणार आहेत.
दिनेश लाड यांनी माझा कट्ट्यावर बोलताना क्रिकेट बोलताना काही परखड मतेदेखील मांडली. सध्या देशासाठी खेळायला तयार नाही करत तर आयपीएल, पैशांसाठी तयार करतात अशी खंत त्यांनी व्यक्त केली. पालक क्रिकेटपटू घडवू शकत नाही..खेळाडू स्वत: घडतात. त्यांना योग्य संधीची, मार्गदर्शनाची आवश्यकता असल्याचे लाड यांनी सांगितले. रोहित शर्मा याच्या गोलंदाजीवर प्रभावित होऊन त्याला आमच्या शाळेत प्रवेश घेण्याससाठी राजी केले. त्यावेळी शाळेतून त्याला फ्रीशिप मिळवून दिली. रोहितने त्याला मिळालेल्या संधीचे सोनं करून दाखवलं असल्याचे कौतुकोद्गगार ही लाड यांनी काढले. खेळाडूमध्ये आत्मविश्वास असणे आवश्यक आहे. तो रोहित शर्माकडे आहे, असेही त्यांनी सांगितले. दिनेश लाड यांनी यावेळी शार्दुल ठाकूरबाबतच्या आठवणींना उजाळा दिला. 2005 मध्ये शार्दुल हा आमच्या शाळेच्या विरोधात मॅच खेळला, चांगला परफॉर्मन्स केला होता. फलंदाजी आणि गोलंदाजीत त्याने चांगली कामगिरी केली. त्यावेळी पालघरमध्ये तो शिकत होता. त्यावेळी त्याच्या वडिलांना आमच्या शाळेत त्याने प्रवेश घ्यावा यासाठी विनंती केली. मात्र, पालघर-मुंबई प्रवासात ये-जा करण्यासाठी सात तास लागतील. यातून त्याच्या अभ्यासाचे नुकसान म्हणून शार्दुलच्या वडिलांनी नकार दिला होता.फेब्रुवारी ते मे दरम्यान 22 फोन केल्याची आठवण लाड यांनी सांगितली. अखेर पत्नीसोबत चर्चा करून शार्दुलला आपल्या घरी ठेवले असल्याची आठवण त्यांनी दिली. मी रोहित किंवा शार्दुल यांना घडवले नाही. तर, ते स्वत: घडले..त्यांनी मेहनत केली असल्याचेही लाड यांनी आवर्जून सांगितले.
आचरेकर सरांकडून ही गोष्ट शिकलो...
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, प्रवीण आमरे, विनोद कांबळी यांसारख्या क्रिकेटपटूंना घडवणारे क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर हे दिनेश लाड यांचे गुरू होते. आचरेकर सरांकडून काय शिकलात, हे विचारले असता लाड यांनी सांगितले की, आचरेकर सरांनी खेळाडूंच्या नैसर्गिक खेळावर भर दिला. मुलांना सामने अधिक खेळवायचे. त्यातून मुलांना कळायचं की काय चुकतंय आणि त्यातून ते सुधारणा करायचे. मुलांच्या नैसर्गिक खेळात बदल न करता त्याला घडवण्याचे काम आचरेकर सरांनी केले असल्याची आठवण त्यांनी सांगितली. आमच्या शाळेने शारदाश्रम शाळेला एका स्पर्धेत पराभूत केले. त्यावेळी आचरेकर सरांनी पाठीवर कौतुकाची थाप मारत वेल डन असे म्हटले. तो क्षण माझ्यासाठी महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
पैशापेक्षा मुलाचे क्रिकेट निवडले
क्रिकेट कोचिंगमुळे नोकरीतील पगाराशिवाय थोडे अतिरिक्त पैसे मिळत होते. त्यातून घरी जाण्यासाठी रात्रीचे 9 वाजत असे. माझा मुलगा लहान असताना त्याच्यात क्रिकेटचे टॅलेंट दिसले. त्याच्यासाठी आपण ही कोचिंग सोडली आणि त्याला पूर्ण वेळ दिला असल्याचे लाड यांनी सांगितले. पैशाला महत्त्व दिले असते आणि मुलाला वेळ दिला नसता तर सिद्धेश लाड हा चांगला क्रिकेटपटू म्हणून समोर आला नसता असेही त्यांनी म्हटले.