नवी दिल्ली :  प्रजासत्ताक दिनासाठी महाराष्ट्राचा चित्ररथ केंद्राने नाकारल्याच्या बातम्या खोट्या आणि खोडसाळपणाच्या असून  चित्ररथाचे काम व्यवस्थित सुरू असल्याची माहिती  सांस्कृतिक कार्य संचालनालयाने दिली आहे.  पश्चिम बंगालप्रमाणेच महाराष्ट्राच्याही चित्ररथाला परवानगी न दिल्याच्या  बातम्या समोर आल्या होत्या त्यावर   सांस्कृतिक कार्य संचालनालयाने स्पष्टीकरण दिले आहे. 


यंदा प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी राजपथावर युनेस्कोने मान्यता दिलेल्या सूचीमध्ये महाराष्ट्रातील ‘कास पठार’चा  चित्ररथ असणार आहे. याबाबत वेळोवेळी संरक्षण मंत्रालयाच्या सूचनेनुसार बैठका आयोजित होऊन महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाची एकूण 12 राज्यांसमवेत निवड अंतिम करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत राष्ट्रीय रंगशाळा, नवी दिल्ली येथे संरक्षण मंत्रालयाच्या देखरेखीखाली चित्ररथाची बांधणी सुरु असून सदरील कामकाज हे अंतिम टप्प्यात आहे.  महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारल्याबाबत कोणतीही सूचना संरक्षण मंत्रालयाकडून प्राप्त झालेली नाही.


राज्य सरकारने राज्यातील प्राणी, पक्षी तसेच अन्य जीवांसाठी राष्ट्रीय स्तरावर अभयारण्य राज्य शासनाने राखीव ठेवले आहे. अनेक दुर्मीळ वनस्पती तसेच प्राण्यांच्या प्रजाती या महाराष्ट्रात आढळतात. 'शेकरू'  हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे. 'हरियाल' हे विशेष असलेले कबुतर राज्यपक्षी म्हणून घोषित करण्यात आले आहे. 'ब्ल्यू मॉरमॉन' या विशेष प्रजातीची राज्य फुलपाखरू म्हणून घोषणा करणारे महाराष्ट्र हे प्रथम राज्य आहे. महाराष्ट्रातील हीच जैवविविधता चित्ररथाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे. या चित्ररथाची संकल्पना, सांस्कृतिक कार्य संचालनालयाची असून त्यावर अनेक कलाकार काम करीत आहेत. महाराष्ट्रातील वैविध्यपूर्ण जैव वारसा कवितेच्या व मधुर संगीताच्या रूपात मांडण्यात आलेला आहे.


संबंधित बातम्या :


Republic Day : यंदाच्या प्रजासत्ताकदिनी राजपथावर होणार महाराष्ट्रातील जैवविविधतेचं अनोखं दर्शन


Uttarakhand Election : भाजपमधून हकालपट्टी केल्यानंतर हरक सिंह रावत भावूक, काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा




 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha