Ravindra Chavan : भाजप विचारधारेच्या उगमस्थानीच मराठी; आमची मराठीची व्याख्या अनेकवचनी आणि व्यापक : रवींद्र चव्हाण
Ravindra Chavan News : भाजपा आणि मराठी माणूस या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत, मराठी माणसाने स्थापन केलेल्या मातृसंस्थेची विचारधारा हीच भाजपाची विचारधारा आहे असं रवींद्र चव्हाण म्हणाले.

मुंबई : भाजपाचे ‘मराठी’ हे केवळ भाषेपुरते मर्यादित नसून ते मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मितेचा व्यापक आणि सकारात्मक विचार मांडणारे आहे, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी केले. भाजपाचे मराठी म्हणजे मराठी व्याकरणातील अनेकवचनासारखे असून, 'आम्ही आपले आपण' असा समावेशक दृष्टिकोन त्यामागे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मराठीवर राजकारण करू नका, विरोधकांना इशारा
विरोधकांवर कडाडून टीका करताना रवींद्र चव्हाण म्हणाले की, मराठी भाषेवर राजकारण करणे थांबवा. हा विषय विषामृतासारखा असून, त्यातून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होऊ नये. विरोधकांची मराठी भाषेबाबतची भूमिका नकारात्मकतेने भरलेली असून, ती संत ज्ञानेश्वर माऊलींच्या “विश्वात्मके देवे” या वैश्विक तत्त्वाशी विसंगत असल्याचे त्यांनी नमूद केले.
भाजपा आणि मराठी माणूस वेगळे नाहीत
भाजपा आणि मराठी माणूस या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत, असे स्पष्ट करताना रवींद्र चव्हाण म्हणाले की, मराठी माणसाने स्थापन केलेल्या मातृसंस्थेची विचारधारा हीच भाजपाची विचारधारा आहे. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे या तीनही मराठी भाषिक थोर व्यक्तींच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन देश आणि समाज घडवण्याचे कार्य भाजपा वर्षानुवर्षे करत आहे.
जागतिक मराठी समाजासाठी कटिबद्ध
केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभरात राहणाऱ्या मराठी भाषिकांच्या उन्नतीसाठी भाजपा कटिबद्ध आहे. राज्याची प्रगती, नागरिकांचे जीवन अधिक सुसह्य व्हावे, देशभक्त आणि संस्कारित पिढी निर्माण व्हावी यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
अभिजात मराठी आणि गुढी पाडवा शोभायात्रेचा उल्लेख
भाजपाने मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून दिला असून, जगभर साजरी होणारी गुढी पाडवा शोभायात्रा ही संकल्पनाही प्रथम भाजपाच्या कार्यकर्त्यांकडूनच सुरू झाली, याकडे रवींद्र चव्हाण यांनी लक्ष वेधले. हेच भाजपाच्या मराठी विचारांचे अनेकवचन असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
ही बातमी वाचा:























