Ram Navami 2022 LIVE : रामनवमीचा सर्वत्र उत्साह, पंतप्रधान मोदींनी दिल्या खास शुभेच्छा, वाचा प्रत्येक अपडेट्स

Ram Navami 2022 : आज रामनवमी. रामनवमीचा आज देशभरात उत्साह आहे. राम नवमीसंदर्भात सर्व अपडेट्स एका क्लिकवर....

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 10 Apr 2022 11:57 PM
Jalgaon : राम नवमीच्या शोभा यात्रेत गिरीश महाजनांचा ठेका 

Jalgaon : राम नवमीच्या निमित्ताने आज जळगाव जिल्ह्यात जामनेर येथे भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. यात भाजप नेते गिरीश महाजन यांनी मोठ्या उत्साहात नाच केल्याचं पाहायला मिळाले आहे. 
गिरीश महाजन हे नेहमीच त्यांच्या अनोख्या नृत्य शैलीने अख्या महाराष्ट्राला परिचित आहेत. कोणताही आनंदाचा क्षण मिळाला की गिरीश महाजन यांना नाच करण्याचा मोह आवरत नसल्याचं नेहमीच पाहायला मिळालं आहे. 


आज श्रीराम जन्मोत्सव समिती, बजरंग दल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदार संघात भव्य शोभा यात्रा काढण्यात आली होती. मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे  निर्बंध असल्याने राम नवमी साजरी करताना अनेक मर्यादा होत्या. यंदा मात्र कोरोनाचे सर्वच निर्बंध हटविण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. 
यावेळी हजारोच्या संख्येने कार्यकर्ते शोभायात्रेत सहभागी झाले होते. यावेळी कार्यकर्त्यानी त्यांना नाचण्याचा आग्रह केला. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या खांद्यावर उभे राहून गिरीश महाजन भेभान होऊन नाचले. 

Solapur : सोलापुरात श्रीराम नवमीनिमित्त निघालेल्या यात्रेदरम्यान पोलिस आणि कार्यकर्त्यात वादावादी

Solapur :  सोलापुरात श्रीराम नवमीनिमित्त निघालेल्या यात्रेदरम्यान कोंतम चौकात पोलिस आणि कार्यकर्त्यात वादावादी झाली आहे. पोलिसांनी मिरवणूक मार्गात अचानक बदल केल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले. कायदा सुव्यवस्थेसाठी पोलिसांनी यात्रा मार्गात काही बदल केला. हजारो युवक कोंतम चौकात जमा झाल्याने काही मिनिटं तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी समजूत घातल्यानंतर मिरवणूक पुढे मार्गस्थ झाली. 

Yavatmal : रामनवमीच्या शोभरात्रेत केरळच्या पारंपारिक वाद्यांने वेधले यवतमाळ करांचे लक्ष 

Yavatmal : रामनवमीनिमित्त यवतमाळ शहर राममय झाले असून हाती भगवे ध्वज, भगवे फेटे परिधान केलेले शेकडो युवक या शोभायात्रेत सहभागी झाले होते. यावेळी केरळच्या 23 कलाकारांचे वाद्य आणि देवीदेवतांच्या कलाकृतीने यवतमाळकरांचे लक्ष वेधले. 
ठिकठिकाणी यवतमाळकरांनी या शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. जय हिंद चौकातून आकर्षक रथावर श्रीरामाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी आमदार मदन येरावार यांच्यासह रामभक्तांनी हाताने हा रथ ओढला. शहरातले सुप्रसिद्ध ढोलपथक, शंभरहून अधिक झांकी, चित्ररथ शोभायात्रेत सहभागी झाले होते. श्री रामनवमी शोभायात्रा समितीने या निमित्त शहरात रामधून वाजविली. ठिकठिकाणी भजन व गायनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
राम जन्मोत्सव समिती, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाने ही शोभायात्रा काढली. 

Kalyan : श्रीराम नवमीनिमित्त कल्याण येथे भाजपतर्फे भव्य शोभायात्रा 

Kalyan : शोभयात्रेच्या माध्यामातून कल्याण येथे आज भाजपतर्फे श्रीराम नवमी साजरी करण्यात आली. श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण आणि हनुमंत यांच्या भव्य प्रतिकृती तसेच श्रीरामाच्या, हनुमंताच्या वेशातील बच्चे कंपनी या शोभायात्रेतील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्या. 
कल्याण येथे प्रथमच या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. कल्याण पश्चिमेच्या सुंदरनगर येथून ही शोभायात्रा सुरू होऊन आग्रा रोड, बेतुरकर पाडा, श्रीराम मंदिर, सहजानंद चौक, संतोषी माता रोडमार्गे यशवंराव चव्हाण क्रीडांगण येथे समाप्त झाली. यावेळी भाजपचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले होते. दरम्यान जय श्रीरामच्या घोषणांनी शोभायात्रेचा मार्ग दणाणून गेल्याचे यावेळी पाहायला मिळाले.

Nashik : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येेथे राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

Nashik : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येेथे राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मालेगाव कॅम्प भागातील बालाजी मंदिरा जवळून मिरवणूक काढण्यात आली. यावर्षी आयोध्येतील नियोजित राम मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली होती. कृषिमंत्री दादा भुसे आणि धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुभाष भामरे यांच्या हस्ते महाआरती करून मिरवणूक संपन्न झाली. 

Nagpur : नागपुरातील रामनवमीनिमित्त शोभायात्रेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थिती

Nagpur : नागपुरातील रामनगर येथील राम मंदिरातून रामनवमीनिमित्त शोभायात्रा निघाली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित आहेत. 1 एप्रिल रोजी कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर तयारीला फार कमी वेळ मिळाल्यामुळे यंदाची शोभायात्रा नेहमीच्या तुलनेत छोटी आहे. तर नागपूरातील प्रसिद्ध पोद्दारेश्वर राम मंदिरातून निघणारी शोभायात्रा यावेळेला रद्द करण्यात आली आहे.

Buldhana: जळगाव जामोद वन विभागातील पाणवठे कोरडे झाल्याने वन्य प्राणी गावाकडे

जळगाव जामोद वन क्षेत्रातील सूनगाव या गावाजवळील बाल गोविंद महाराज मंदिरात आज रामनवमी निमित्ताने भक्तांची गर्दी होती अशातच जंगलातून पाण्याच्या शोधात एक अस्वल मंदिर परिसरातील हौदा जवळ आले. जवळपास एक तास हे अस्वल पाण्याच्या शोधात या परिसरात होतं, त्यामुळे मात्र मंदिरात आलेल्या भक्तांमध्ये भीतीच वातावरण बघायला मिळालं. जळगाव जामोद वन परिक्षेत्रातील वन्य प्राण्यांसाठी तयार करण्यात आलेले पाणवठे कोरडे पडल्याने आता हिंस्त्र वन्य जीव पाण्याच्या शोधात गावाकडे येताना दिसत आहे.

Aurangabad News Upadet :  रामनवमीनिमित्त शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी विना घालून केले भजन

Aurangabad News Upadet : औरंगाबादमध्ये रामनवमीनिमित्त शिवसेना आणि भाजपाचे नेते एकत्र आलेले पाहायला मिळाले. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी राम जन्मोत्सव सोहळा साजरा केला. शिवाय यावेळी सामूहिक आरती देखील करण्यात आली. यावेळी मनसेचे नेते देखील उपस्थित होते. याबरोबरच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शहरातील राम मंदिरामध्ये विना घालून भजन केले. 

बीडच्या श्रीक्षेत्र नेकनूर येथे श्रीराम जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा..

मर्यादापुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव म्हणजेच रामनवमीचा  सोहळा देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र नेकनूर  येथे श्रीराम मंदीरात पारंपारिक पद्धतीने भजन कीर्तनाच्या जयघोषात अनोखा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.. शेकडो वर्षांची ही परंपरा आहे.. प्रभू रामचंद्राच्या जय घोषने परिसरातील दुमदुमून निघाला..जन्माचे किर्तन महंत लक्ष्मण महाराज मेंगडे यांचे संपन्न झाले यावेळी हजारोच्या संख्येने महिला पुरुष भाविक भक्तांची उपस्थिती होती.. कोरोणा महामारीच्या संकटा नंतर पहिल्यांदाच मोठया उत्साहात सोहळा संपन्न होत आहे. प्रभू राम हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. त्यांचे आदर्श तत्व आजही इथला समाज व्यवस्थेला दिशा दाखवतात असे महाराजांनी सांगितले.

pune ram navami:  पुण्यातील अक्षय शहापूरकर या कलाकाराने साकारली रामनवमीनिमित्त एक विशेष रांगोळी

pune ram navami:  पुण्यातील अक्षय शहापूरकर या कलाकाराने त्याच्या साथीदारांसह रामनवमीनिमित्त एक विशेष रांगोळी साकारली आहे. एकाच रांगोळीतून दोन भिन्न प्रतिमा रेखाटल्या जातात ,समोरून पाहतांना काहीशी अस्पष्ट दिसणाऱ्या या रांगोळीत विशिष्ट रचनेमुळे दोन वेगवेगळ्या प्रतिमांचे दर्शन घडते. या टू-इन-वन रांगोळी मध्ये एका बाजूने प्रभू श्रीराम तर दुसऱ्या बाजूने हनुमानाचे दर्शन होते.

Beed : 41 फूट उंच पताका फडकावून रामनवमी साजरी

Beed :  बीड जिल्ह्यातील रामगड संस्थांच्या वतीने यावर्षी मोठ्या उत्साहात रामनवमी साजरी करण्यात आली आहे रामनवमीच्या निमित्ताने रमगडावर 41 फूट उंचीची भगवी पताका फडकाऊन रामनवमी साजरी करण्यात आली. दरवर्षी रामनवमीनिमित्त राम गडावर विविध धार्मिक कार्यक्रमाच आयोजन केल जात कोरणामुळे मागील दोन वर्षापासून सार्वजनिक कार्यक्रमावर निर्बंध लादण्यात आले होते या वर्षी मात्र निर्बंध उठल्याने मोठ्या उत्साहात पंचक्रोशीतील भाविकांनी एकत्र येऊन रामनवमी उत्साहात साजरी केली आहे.

PM Modi On Ram Navami : पंतप्रधान मोदींच्या रामनवमीनिमित्त शुभेच्छा

अमरावतीकरांची आजची पहाट गीतरामायणाने
काव्य नव्हे, हे अमृतसंचय, अशा शब्दांत ज्याचे वर्णन केले जाते, ते ग. दि. माडगूळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून लिहिले गेलेले आणि संगीतकार सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेले गीतरामायण यंदाही अमरावतीत आयोजित करण्यात आले.. आज पहाटे ५.१५ वाजता कॅम्प परिसरातील हॉटेल ग्रॅण्ड महफीलच्या बंधन लॉनवर हा अलौकिक स्वर आणि नृत्याविष्कार सोहळ्याला सुरुवात झाली. डॉ. राजेश उमाळे आणि संच गीतरामायण तर प्राचार्य शीतल मेटकर आणि त्यांचा संच गीतरामायणातील गीतांवर नृत्यकलाविष्कार सादर केला..
आळंदीच्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात श्री रामांची प्रतिकृती

रामनवमी निमित्त पुण्यातील देहू-आळंदीत सजावट करण्यात आली आहे. आळंदीच्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात श्री रामांची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. रंगीबेरंगी फुलांनी माऊलींचा गाभारा ही सजलाय. मंदिराच्या सभामंडपात पाळणा उभारत रामनवमी साजरी केली जातेय. देहूच्या संत तुकाराम महाराज मंदिरात विविध फुलांची सजावट भाविकांना आकर्षित करत आहे.

शेगावात संत गजानन महाराज मंदिरात राम जन्मोत्सव सोहळ्याला प्रारंभ

शेगावात संत गजानन महाराज मंदिरात राम जन्मोत्सव सोहळ्याला प्रारंभ झाला आहे. राज्यभरातून शेकडो दिंड्या शेगावात दाखल झाल्यात. कोरोना निर्बंध मुक्तीनंतर शेगावात पहिलाच उत्सव आहे. राम नवमी निमित्त शेगावातील संत गजानन महाराज मंदिरात राम जन्मोत्सव सोहळा आज मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. राम जन्मोत्सव सोहळ्यासाठी राज्यभरातून शेकडो दिंड्या शेगावात दाखल झाल्या आहेत. सकाळपासून रामजन्मोत्सवाला सुरुवात झाली आहे. दुपारी 12 वाजता मुख्य सोहळा होणार आहे. कोरोनाच्या निर्बंधातून मुक्तता झाल्यानंतर हा मंदिरात साजरा होणारा पहिलाच उत्सव असल्याने आज सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे.  विशेष म्हणजे कोरोनाच्या निर्बंधात दर्शनासाठी लागणारी ई पासचा आज शेवटचा दिवस आहे.  आजचा राम जन्मोत्सव सोहळा संपल्यानंतर उद्यापासून तीन दिवस मंदिर भाविकांसाठी बंद असणार आहे.  14 तारखेपासून भाविकांसाठी ई पास मुक्त दर्शन मिळणार आहे.  राज्यभरातून भाविकांनी आज गर्दी केली असली तरी मात्र आजच्या दिवसभर E Pass धारक फक्त नऊ हजार भाविकांनाच दर्शनाचा लाभ मिळणार आहे. 

रामनवमी निमित्त विठ्ठल रुक्मिणी गाभारा बनला काश्मिरी सफरचंदाचा बगिचा 

आज रामनवमीच्या औचित्य साधत पुणे येथील एका भक्ताने विठ्ठल रुक्मिणी गाभाऱ्यातून 5 हजार सफरचंदाची आकर्षक सजावट केल्याने विठुरायाची राउळी चक्क काश्मिरी सफरचंदाचा बगीचा बनली आहे. विठ्ठल मंदिरात विविध सणांना होणारी सजावट ही नेहमीच आकर्षणाचा केंद्र राहिली आहे. आज रामनवमी असल्याने पुणे येथील भक्त भारत रामचंद्र यादव यांनी सफरचंद आणि फुलांचा वापर करीत ही सजावटीची सेवा दिली आहे . विठ्ठल रुक्मिणी गाभारा , चौखांबी , सोळखांबी या ठिकाणी हि सजावट करण्यात आली आहे . यासाठी 5 हजार सफरचंद, पांढरी आणि पिवळी शेवंती आणि दवना याचा सजावटीसाठी वापर केला आहे. विठ्ठल रुक्मिणी गाभारा सफरचंदाने लगडून गेल्याने देवाच्या मंदिराला काश्मिरी बगीचाचे रुपडे प्राप्त झाले आहे . 

Ram Navami Utsav In Shirdi : शिर्डीत रामनवमीचा उत्सव; कोरोना निर्बंध हटवल्याने साईभक्तांमध्ये  उत्साह

Ram Navami Utsav In Shirdi :  रामनवमी उत्सवासाठी शिर्डीत लाखो साईभक्त दाखल झाले आहेत.  कोरोनाचे सर्व निर्बंध हटवल्याने यावर्षी मोठा उत्साह साईभक्तांमध्ये दिसून येतोय. रामनवमी उत्सव शिर्डीत तीन दिवस साजरा केला जातो. आज उत्सवाचा मुख्य दुसरा दिवस असून दिवसभर विविध कार्यक्रम पारंपारिक पद्धतीने साजरे केले जात आहेत.  या वर्षी पालख्या घेऊन येण्यास परवानगी असल्याने राज्यभरातून साईनामाचा जयघोष करत शेकडो पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत. सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेल्या साईबाबांच्या शिर्डीत आज रामनवमीचा मोठा उत्साह बघायला मिळतोय.  आज सर्व साईभक्तांना दर्शन घेता याव यासाठी मंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  दुपारी 4 वाजता निशाण मिरवणूक तर सायंकाळी 5 वाजता रथ मिरवणूक ही काढण्यात येणार आहे

राम नवमीसाठी लागणारी हवन सामग्री

आंब्याचं लाकूड, आंब्याची पानं, पिंपळाचं पान, बेल, लिंबाची पानं, ,बेल, नीम, उंबराची साल, चंदनाचं लाकूड, अश्वगंधा, गुळवेलची मुळी, कापूर, तीळ, तांदूळ, लवंग, गाईचं तूप, विलायची, साखर, नवग्रहाचं लाकूड, पंचामृत, नारळ, जवस 

Bhagat Singh Koshyari : अयोध्येत श्रीराम मंदिर लवकरात लवकर बनेल आणि देशात रामराज्य येईल: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Bhagat Singh Koshyari : आज रामनवमी. रामनवमीचा आज देशभरात उत्साह आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रामनवमीनिमित्त अयोध्येत श्रीराम मंदिराबाबत सांगितलं आहे. ते म्हणाले, 'श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचे चारित्र्य जेवढे अभ्यासू, तेवढी आयुष्यात प्रगती होईल. महात्मा गांधी म्हणूनच म्हणायचे, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीता राम. रामनवमीच्या निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा. अयोध्येत श्रीराम मंदिर लवकरात लवकर बनेल आणि देशात रामराज्य येईल.'

Shirdi : रामनवमी उत्सवानिमित्त शिर्डीत साईभक्तांची मोठी गर्दी

Shirdi : रामनवमी उत्सवानिमित्त शिर्डीत साईभक्तांनी मोठी गर्दी केली असून अनेक पायी पालख्या शिर्डीत दाखल होताय. राज्यभरातून येणाऱ्या पालख्या मुळे शिर्डीतील रस्ते गजबजून गेले असून संभाजीनगर येथुन आलेल्या पालखीतील साईभक्तांची गर्दी 

Sindhudurg : वाळूशिल्पकार रविराज चीपकर यांनी रामाचे वाळूशिल्प साकारून रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या

Sindhudurg : रामनवमी उत्सवानिमित्त वेंगुर्ले सागरेश्वर समुद्र किनारी वाळूशिल्पकार रविराज चीपकर यांनी रामाचे वाळूशिल्प साकारत अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त सागरेश्वर समुद्र किनारी वाळू शिल्पकार रविराज चीपकर यांनी नारायण राणेना वाढदिवसानिमित्त वाळू शिल्पाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.

पार्श्वभूमी

Ram Navami 2022 : आज रामनवमी. रामनवमीचा आज देशभरात उत्साह आहे. चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजले गेलेले श्री राम यांचा जन्म झाला, अशी मान्यता आहे. हा दिवस श्री रामनवमी म्हणून साजरा करतात. त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर (दुपारी 12 वाजता) रामजन्माचा सोहळा होतो. श्री रामांच्या चित्रास वा मूर्तीस इतर हारांसमवेतच गाठीपण घालतात. श्री रामांची पूजा करताना त्यांना करंगळीजवळच्या बोटाने, म्हणजेच अनामिकेने गंध लावतात. तसेच श्री रामांना हळद-कुंकू वाहताना. आधी हळद अन् नंतर कुंकू, उजव्या हाताच्या अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन चरणांवर वाहतात. श्रीरामांना केवडा, चंपा, चमेली अन् जाई ही फुले वाहतात. त्यानंतर आरती करून प्रसाद वाटतात. रामजन्माच्या दिवशी साजरा केल्या जाणाऱ्या उत्सवात रामजन्माचा पाळणा अवश्य म्हटला जातो.


राम नवमी 2022 चा शुभ मुहूर्त :


राम नवमी तारीख - 10 एप्रिल 2022, रविवार
नवमी तिथी सुरू - 10 एप्रिल रोजी रात्री उशिरा 1:32 मिनिटांपासून सुरू
नवमी तिथी समाप्त - 11 एप्रिल रोजी पहाटे 03:15 पर्यंत
पूजेचा मुहूर्त - 10 एप्रिल सकाळी 11:10 ते 01:32 मिनिटे


राम नवमीसाठी लागणारी हवन सामग्री


आंब्याचं लाकूड, आंब्याची पानं, पिंपळाचं पान, बेल, लिंबाची पानं, ,बेल, नीम, उंबराची साल, चंदनाचं लाकूड, अश्वगंधा, गुळवेलची मुळी, कापूर, तीळ, तांदूळ, लवंग, गाईचं तूप, विलायची, साखर, नवग्रहाचं लाकूड, पंचामृत, नारळ, जवस 


राम नवमी पूजा पद्धत :


रामनवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे आटोपल्यानंतर स्वच्छ कपडे घालावे. त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांनी भगवान श्री राम, लक्ष्मण आणि माता सीता यांची विधिपूर्वक पूजा करावी. पूजेपूर्वी त्यांना कुंकुम, सिंदूर, रोळी, चंदन इत्यादींनी तिलक करावं आणि बांधावर तांदूळ आणि तुळस अर्पण करावी. रामनवमीच्या दिवशी भगवान विष्णूचा अवतार श्री राम यांना तुळशी अर्पण केल्याने ते लवकर प्रसन्न होतात. पूजेमध्ये देवतांना फुले अर्पण करावे. त्यानंतर तुपाचा दिवा आणि अगरबत्ती लावल्यानंतर श्री रामचरित मानस, रामरक्षा स्तोत्र किंवा रामायणाचे पठण करावे. श्री राम, लक्ष्मणजी आणि माता सीता यांना झुलवल्यानंतर त्यांची आरती करा आणि भक्तांमध्ये प्रसादाचे वाटप करावा.


Disclaimer: ही माहिती केवळ पौराणिक माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.  


महत्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.