Raksha Bandhan 2023: रक्षाबंधन (Raksha Bandhan) सण बुधवारी, 30 ऑगस्टलाच दिवसभर साजरा करायचा आहे. या दिवशी भद्राकाल असल्याने राखी बांधली तर वाईट होईल, अशा अफवा पसरल्या आहेत, मात्र त्यात काहीही तथ्य नाही, असं पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी स्पष्ट केलं आहे.


दिवसभर साजरा करू शकता रक्षाबंधन


रक्षाबंधनच्या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते. जर मंत्रोपचार, पूजा, धार्मिक विधी करून रक्षाबंधन करायचं असेल तर तो भद्रा करण असताना केला जात नाही. 30 ऑगस्टच्या दिवशी सकाळी 10:58 ते रात्री 9:02 भद्रा करण आहे. महाराष्ट्रात मंत्रोपचार, पूजा तसेच धार्मिक विधी करून रक्षाबंधन करण्याची पद्धत नाही, त्यामुळे संपूर्ण दिवसात कधीही राखी बांधली तरी चालेल.


भद्राकाळात राखी बांधली तर वाईट होईल, असा मॅसेज व्हायरल होत आहे आणि त्यात काहीही तथ्य नाही, असं पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यानी सांगितलं. रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा बुधवारी 30 ऑगस्ट रोजीच असल्याचे त्यांनी हे स्पष्ट केलं आहे.


व्हायरल मेसेजला बळी पडू नका - दा. कृ. सोमण


रक्षाबंधन विधीवत पूजा करून मंत्रोच्चाराने साजरी करायची असेल तर रेशमी वस्त्रात अक्षता, सुवर्ण, दूर्वा, चंदन, केशर आणि सरसूचे दाणे घालून पोतडी करून ती बांधायची असते. हा विधी बुधवार 30 ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजून दोन मिनिटांनी भद्रा संपल्यावर करायचा आहे. मात्र आपण जी राखी बांधतो त्याला भद्रा काल वर्ज्य नाही.आपण जो सण साजरा करतो तो सामाजिक आहे आणि कौटुंबिक आहे त्याला भद्रा काल पहायची गरज नाही, असं पंचांगकर्ते म्हणाले. रक्षाबंधन या कौटुंबिक आणि सामाजिक सोहळ्याला वेळेचं बंधन नाही. बुधवारी, म्हणजेच 30 ऑगस्ट रोजी संपूर्ण दिवस रक्षाबंधन सोहळा साजरा करता येईल, असंही सोमण म्हणाले.


पंचागकर्ते  मोहन दाते यांनीही दिलं स्पष्टीकरण


पंचागकर्ते  मोहन दाते म्हणाले, होम हवन करून केलेल्या रक्षाबंधनासाठी भद्रा काळ हा वर्ज्य सांगितला आहे. मात्र आता आपण जे रक्षाबंधन साजरे करताना आपण फॅन्सी राख्या बांधतो. त्यामुळे बहिणीने भावाला राखी बांधताना, मित्राने मित्राला बांधताना, समाजबांधवांनी एकमेकांना बांधताना भद्रा काळ वर्ज्य करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे बुधवारी रक्षाबंधन दिवसभरात कोणत्याही वेळी आनंदाने  साजरा  करावा . या दिवशी कोणतीही वेळ पाळण्याची गरज नाही, त्यामुळे भाऊ-बहिणी दिवसभर रक्षाबंधनाचा सण साजरा करू शकतात. 


हेही वाचा: