पुणे : गणेशोत्सव अवघ्या काही (Ganeshotsav 2023) दिवसांवर आला आहे. यंदा कोणत्या नव्या प्रकारच्या गणेशमूर्ती बाजारात पाहायला मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. लालबागचा राजा, दगडूशेठ, शारदा गणेश या एव्हरग्रीन गणेशमूर्त्यांसोबतच पर्यावरणपूरक गणेशमूर्तीकडे भाविकांचा कल वाढला आहे. शाडूच्या मूर्ती तर मागणी आहेच पण यंदा 'वृक्षगजानन' या प्रकारातील पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विशेष आकर्षण ठरत आहेत. 


या गणेशमूर्ती वैशिष्ट्य म्हणजे शंभर टक्के पर्यावरणपूरक अशा शेतमातीपासून या मूर्ती बनवल्या जातात. विसर्जनावेळी या मूर्तीसोबत दिलेल्या कुंडीमध्ये विसर्जित करून त्यामध्ये झाड लावता येते, अशी या मूर्तीची खासियत आहे. या 'वृक्षगजानन' या मुर्तीची संकल्पना डॉ. अक्षय कवठाळे यांची आहे.


कशी साकारली संकल्पना?


डॉ. अक्षय विठ्ठल कवठाळे यांनी आपले वडील कृषीशास्त्रज्ञ विठ्ठल केशव कवठाळे यांच्या मदतीने 'वृक्षगजानन' ही संकल्पना 2013 मध्ये सुरू केली. सुरुवातीला गणेशमूर्तींचा आकार, त्यांचा टिकाऊपणा, सप्लाय चेन मेंटेन करणे अशा छोट्या छोट्या गोष्टींचा अनुभव घेऊन सुधारणा करत 2015 मध्ये व्यवसाय सुरळीत सुरू झाला. 


त्यानंतर 2017 मध्ये व्यवसायातील डिस्ट्रीब्युशन चेन तयार करण्याचं काम सुरू झालं. आजच्या घडीला त्यांच्या वृक्षगजानन मूर्ती महाराष्ट्राव्यतिरिक्त गुजरात, मध्यप्रदेश, आंधरप्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये पाठवल्या जातात. त्याचबरोबर दुबई, यूके, यूएस, जर्मनी, जपान या देशांमध्येसुद्धा त्यांच्या मूर्ती पोहोचतात. महाराष्ट्रामध्ये 'वृक्षगजानन' मूर्तींचे आउटलेट्स लागतात. होलसेल आणि रिटेल अशा दोन्ही प्रकारात या मूर्ती उपलब्ध करून दिल्या जातात.  


काय आहे 'वृक्षगजानन' मूर्तीचे स्वरूप?


'वृक्षगजानन' मूर्ती ऑर्डर केल्यानंतर दोन बॉक्स येतात. यातील एका बॉक्समध्ये गणपतीची मूर्ती दिली जाते. सोबत सिल्व्हर कोटेड पाट असतो तर दुसऱ्या बॉक्समध्ये कुंडी आणि कृष्णतुळशीचे ऑथेंटिक ब्रीड असलेल्या बियांचे पाउचेस दिले जातात. विसर्जनानंतर गणेशमूर्तीच्या मातीची तुळशीच्या रूपाने पूजा होते आणि गणपतीचे पावित्र्य राखले जाते. यासोबतच तुळशी ही औषधी वनस्पती आहे त्यामुळे तुळशीच्या बिया दिल्या जातात. 'वृक्षगजानन' मूर्ती पूर्णतः नैसर्गिक रंगाने रंगवलेल्या असतात. 


पर्यावरणाच्या संवर्धनाचा उद्देश 


पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी आणि वृक्षारोपणाला जास्तीत जास्त लोकांचा हातभार लागावा यासाठी आम्ही ही संकल्पना सुरू केली. त्याचबरोबर आपले उत्सव योग्य पद्धतीने साजरे व्हावेत हाही यामागे उद्देश आहे, असं 'वृक्षगजानन' मूर्त्यांची संकल्पना साकारणारे डॉ. अक्षय विठ्ठल कवठाळे सांगतात. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Pune Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवादरम्यान पुणे शहराला धोका? पुणे पोलिसांकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा