Insurance for Govinda, Dahi Handi 2023: गोविंदांच्या (Govinda Pathak) विम्यासाठी 18 लाख 75 हजारांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. 8 सप्टेंबर 2023 पर्यंत ही शासकीय विमा कवच योजना लागू राहणार आहे. गोविंदांसाठी राज्य सरकारनं घेतलेला हा सर्वात मोठा निर्णय आहे. दरम्यान, गेल्या वर्षी गोविंदा आणि गोविंदा पथकांसंदर्भात राज्य सरकारनं अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते. त्यापैकी काही निर्णयांची आता राज्य सरकारकडून अंमलबजावणी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 


दहीहंडी जवळ आली असून राज्यभरात दहीहंडीसाठी गोविंदा पथकांची जोरदार तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. गोविंदा पथकांचा सरावही जोरात सुरू आहे. अशातच गोविंदांसाठी राज्य सरकारनं महत्त्वाचं पाऊल उचलत मोठी घोषणा केली आहे. गोविंदांसाठी राज्य सरकारनं 18 लाख 75 हजारांची विमा कवच योजना जाहीर केली आहे. ही योजना 8 सप्टेंबर 2023 पर्यंत लागू राहणार आहे. यासंदर्भातील सर्व प्रक्रियांना मंजूरी देत शासकीय आदेश काढून राज्य सरकारनं यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. 


गेल्यावर्षी 50 हजार गोविंदांना राज्य सरकारकडून शासकीय विमा कवच देण्यात आलं होतं. पण आता ही संख्या वाढवून 75 हजारांपर्यंत करण्यात आली आहे. म्हणजेच, राज्यभरातील 75 हजार गोविंदांना शासकीय विमा कवच देण्याचे आदेश जारी केले आहेत. गेल्यावर्षीपेक्षा आणखी अतिरिक्त 25 हजार गोविंदांना राज्य सरकारनं विमा कवच दिलं आहे.  


प्रो-गोविंदा स्पर्धा 31 ऑगस्टला


2014 पासून प्रो-लीग गोविंदा स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार अशी मागणी होती, ती यंदा पूर्ण होत आहे. वरळी येथे डोम थिएटरमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. 31 ऑगस्ट रोजी मुंबई येथील वरळीच्या डोम या ऑडिटोरियममध्ये "प्रो-गोविंदा" स्पर्धेचं आयोजन राज्य समन्वय समितीद्वारा करण्यात येणार आहे, या समितीस शासनाने मान्यता दिली आहे. 


दहीहंडीला खेळाचा दर्जा, गेल्याच वर्षी मुख्यमंत्र्यांनी केलीये घोषणा


दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्याच वर्षी केली होती. राज्य सरकारनं नोकऱ्यांमध्ये खेळाडूंना दिलेल्या पाच टक्के आरक्षणाचा लाभ आता गोविंदांनाही मिळणार आहे. दहीहंडी उत्सवातील गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.  मृत्यू झाल्यास 10 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तर गंभीर जखमी झालेल्यांना 7.50 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तर हात-पाय जायबंदी झालेल्यांना 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्याच वर्षी केली होती. त्यानुसार, या वर्षासाठी गोविंदांच्या विमा कवच योजनेसाठी राज्य सरकारकडून निधी वर्ग करण्यात आला आहे. 


इतर खेळाप्रमाणे राज्यात प्रो गोविंदा स्पर्धा होणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे तयार करताना दुर्घटना होऊन गोविंदांचा अपघाती मृत्यू होतो किंवा ते जखमी होतात. अशा गोविंदांना आणि त्यांच्या कुटुंबियांना हातभार लावण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्याची योजना आखण्यात आली आहे.