सांगली : विधानपरिषदेची एक जागा स्वाभिमानीला देणं ही काही कोणाची दया नाही, तो स्वाभिमानी आणि राष्ट्रवादीमध्ये झालेला समझोता आहे. आता केलेला समझोता पाळायचा की पाठीत पुन्हा धारदार खंजीर खुपसायचं हे राष्ट्रवादीनं ठरवायचं असं राजू शेट्टी म्हणाले. आम्ही त्यांच्या मागे आमदारकी द्या म्हणून कधी गेलो नव्हतो. करेक्ट कार्यक्रमाच्या पलीकडे आणखी एक करेक्ट कार्यक्रम असतो आणि तो मी करेन असा इशाराही राजू शेट्टींनी राष्ट्रवादीला दिला. मी एकदा निर्णय घेतला की मागे हटत नाही, जलसमाधी आंदोलन होणार असंही ते म्हणाले. 


पूरग्रस्तांना आणि शेतकऱ्यांना राज्य सरकारने आर्थिक मदत द्यावी या मागणीसाठी राजू शेट्टी यांनी जलसमाधी आंदोलन सुरु केलं आहे. त्यांच्या या पदयात्रेच्या चौथ्या दिवशी देखील राज्य सरकारकडून कोणताही निर्णय नाही. या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं तर सरकारला महागात पडेल असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. 


मी महाविकास आघाडीचा गुलाम नाही, जिथं महाविकास आघाडी सरकार चुकतंय तिथे मी सरकारविरोधात ठामपणाने बोलणार. पूरग्रस्तांना मदत देताना सरकार चुकलंय, मी पॅकेज देणारा माणूस नाही असे मुख्यमंत्री म्हणाले होते. पण, पूरग्रस्तांना सरकारकडून काहीच मिळाली नाही असा राज्य सरकारला घरचा आहेर राजू शेट्टींनी या आधीच दिला होता. 


जयंत पाटलांनी शेट्टींचा पत्ता कट केल्याची चर्चा
गेल्या दहा महिन्यांपासून प्रलंबित असणाऱ्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा पत्ता कट केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. मागील काही दिवसांपासून राजू शेट्टी यांनी सरकारविरोधात काढलेले मोर्चे आणि आंदोलन याला कारणीभूत असल्याची चर्चा आहे. या काळात राजू शेट्टी यांनी अनेकदा राज्य सरकारवर टीका केली. विशेषत: राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर त्यांनी टीका केली. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये त्यांच्याविरोधात नाराजीचा सूर पहायला मिळतोय. 


आता राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीतून राजू शेट्टी यांचं नाव वगळल्याची चर्चा आहे. हे नाव महाविकास आघाडीने वगळलं की त्यांचा करेक्ट कार्यक्रम जयंत पाटलांनी केला हे अद्याप समोर आलं नाही. त्यामुळे येत्या काळात पुन्हा एकदा राष्ट्रवादी विरुद्ध राजू शेट्टी असं राजकारण तापण्याची शक्यता आहे.


 



संबंधित बातम्या :