मुंबई : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांपैकी राष्ट्रवादीच्या कोट्यातून संधी मिळालेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा पत्ता कापला गेल्याची चर्चा मागील दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्या जागी कोणाला संधी मिळणार याबाबत विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. 


सरकारविरोधातील मोर्चे शेट्टींना भोवले?


मागील 10 महिन्यांपासून प्रलंबित असणाऱ्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा पत्ता कट केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. मागील काही दिवसांपासून राजू शेट्टी यांनी सरकारविरोधात काढलेले मोर्चे आणि आंदोलन याला कारणीभूत असल्याची चर्चा आहे. 


बुधवारी रात्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचं एक शिष्टमंडळ गेलं होतं. यावेळी या शिष्टमंडळाने मागील अनेक महिन्यांपासून प्रलंबित असणाऱ्या आमदारांची नियुक्ती करण्यात यावी अशी विनंती राज्यपालांना केली. परंतु राज्यपालांनी मागच्या निवडणुकांमध्ये पराभूत झालेल्या उमेदवारांची नावं यादीत कशी काय अशी विचारणा केली आणि त्यानंतरच राजू शेट्टी यांचा पत्ता कट झाला असल्याची चर्चा रंगू लागली.


एकीकडे राजू शेट्टी यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा असताना आता दुसरीकडे त्यांच्या जागी माजी आमदार हेमंत टकले यांना संधी देण्यात आल्याची देखील माहिती सूत्रांनी दिलीय. हेमंत टकले हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निष्ठावंत सहकारी मानले जातात. शिवाय ते याआधी दोनवेळा विधान परिषदेचे सदस्य देखील राहिले आहेत. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची ज्यावेळी भेट घेण्यात आली त्याचवेळी या नावाची शिफारश करण्यात आली असल्याची चर्चा आहे


कोण आहेत  हेमंत टकले?


2008 ते 2014 आणि 2014 ते 2020 विधानपरिषद सदस्य


 अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोषाध्यक्ष


कला साहित्य सांस्कृतिक क्षेत्राचा दांडगा अनुभव


 कुसुमाग्रज प्रतिष्ठान, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद या संस्थांसाठी योगदान


 या विषयी उपमुख्यमंत्री अजित पवार  म्हणाले, पराभूत उमेदवारांच्या नावाबाबत आक्षेप आहे. पुनर्विचार करावा लागेल. हेमंत टकले यांचं नाव माध्यमांमध्ये हे नाव कुठून आलं मला माहिती नाही.


 राजू शेट्टी यांचा पराभूत उमेदवार म्हणून जर पत्ता कट होणार असेल तर मग राज्यपाल नियुक्त सदस्यांमध्ये आणखी दोन व्यक्ती अशा आहेत ज्या मागील लोकसभेला पराभूत झाल्या आहेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणुक लढलेले प्राध्यापक यशपाल भिंगे आणि काँग्रेसकडून निवडणुक लढलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा बाबात महाविकास आघाडी काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वपूर्ण राहिल.