MPSC Exam : कोरोनामुळं पुढं ढकलण्यात आलेली एमपीएससीची संयुक्त पूर्वपरीक्षा आज पार पडत आहेत. महाराष्ट्र दुय्यम सेवा 'अराजपत्रित गट ब'साठी ही परीक्षा घेतली जात आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा 'अराजपत्रित गट ब' संयुक्त पूर्वपरीक्षा 2020 ही परीक्षा आधी 11 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 9 एप्रिल रोजी एमपीएससीकडून परिपत्रक काढून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं परीक्षेचं आयोजनासंदर्भात परिपत्रक जारी केलं होतं. त्यामध्ये राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून 3 ऑगस्ट रोजी परीक्षेला परवानगी देणार पत्र प्राप्त झाल्याचं सांगण्यात आलं होतं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेचे आयोगन 4 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात येईल, असं स्पष्ट केलं होतं. तसेच, परीक्षेच्या आयोजनासंदर्भात पुढील अपडेट्स साठी आयोगाच्या वेबसाईटला भेट देण्याचं आवाहन केलं होतं.
मार्च महिन्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्य सेवा परीक्षेनंतर अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे मुंबई पुण्यासह राज्यात आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी केली होती. विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट–ब संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा आयोजित करण्यास आपत्ती व्यवस्थापन विभागानं परवानगी दिली होती. आपत्ती व्यवस्थापन विभागानं परीक्षा घेण्यास परवानगी दिल्यानं परीक्षेचा मार्ग मोकळा झाला होता. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं परीक्षेचं आयोजनासंदर्भात परिपत्रक जारी केलं. तसेच, परीक्षेच्या आयोजनासंदर्भात पुढील माहितीसाठी आयोगाच्या वेबसाईटला भेट देण्याचं आवाहनही केलं आहे.
परीक्षेसाठी जाताना ही काळजी घ्या
- परीक्षेसाठीचं हॉल तिकिट म्हणजे प्रवेशपत्र प्रिंट काढून घ्या.
- आपल्या ओळखपत्राची एक प्रत सोबत असू द्या.
- ब्लॅक पेन सोबत घ्या.
- स्वत:ची पाण्याची बाटली सोबत ठेवा
- सर्वात महत्वाचं म्हणजे मास्क आणि सॅनिटायझर सोबत ठेवा
परीक्षार्थ्यांना लोकल प्रवासाची मुभा
एमपीएससी परीक्षेसाठी परीक्षाकेंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, तसेच परीक्षास्थळी त्यांना लवकर पोहोचता यावं यासाठी त्यांना मुंबईमध्ये लोकलप्रवासाची मुभा देण्यात आली आहे. परीक्षेसाठी उमेदवारांना लोकलमधून प्रवास करायचा असल्यास त्यासाठी त्यांना परीक्षेचं ओळखपत्र दाखवावं लागणार आहे. सरकारनं याबाबत परिपत्रक काढलं आहे.