सांगली : मी महाविकास आघाडीचा गुलाम नाही, जिथं महाविकास आघाडी सरकार चुकतंय तिथे मी सरकारविरोधात ठामपणाने बोलणार. पूरग्रस्तांना मदत देताना सरकार चुकलंय, मी पॅकेज देणारा माणूस नाही असे मुख्यमंत्री म्हणाले होते. पण, पूरग्रस्तांना सरकारकडून काहीच मिळाली नाही, असे म्हणत पूरग्रस्तांसाठी इस्लामपूरमध्ये काढलेल्या आक्रोश मोर्चामध्ये राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केलीय. 


महाविकास आघाडी निर्माण करणाऱ्यापैकी मी एक आहे, मी आजही महाविकास आघाडीमध्ये आहे असेही शेट्टी म्हणालेत. मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारने पूरग्रस्तांची फसवणूक केली आहे. तसेच पूरग्रस्तांच्या पुनर्वसन बाबतीत सरकार आता व्यापार करत आहेत, अशी टीकाही शेट्टी यांनी केली आहे. पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी आम्ही जलसमाधी घेऊ, पण सरकारला गुडघे टेकायला लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा देखील राजू शेट्टी यांनी यावेळी दिला आहे.


कृष्णा आणि वारणा नद्यांना आलेल्या महापुरामुळे जिल्ह्यातील नदीकाठचे प्रंचड नुकसान झाले आहे. आता एक महिना उलटून गेला आहे. मात्र, अद्याप राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत पूरग्रस्तांना मिळाली नाही. त्याचबरोबर पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांकडे राज्य सरकारकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे, असा आरोप करत भाजप आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली इस्लामपूरमध्ये सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा काढण्यात आला. शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी, इस्लामपूर नगरपालिकेचे भाजपचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील आणि माजी आमदार शिवाजीराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर प्रांत कार्यालयावर आक्रोश मोर्चा निघाला. ज्यामध्ये हजारो पूरग्रस्त सहभागी झाले होते.


महाविकास आघाडी सरकारकडून पूरग्रस्तांची फसवणूक : शेट्टी
या आक्रोश मोर्चा प्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या बाबतीत अजित पवार यांनी आता भूखंड देण्याबाबत केलेलं वक्तव्य म्हणजे व्यापार करणार असल्याची टीक केली आहे. तसेच 2005, 2006, 2019 यावेळीचे महापूर आणि त्यानंतरची सरकारची मदत देखील आपण पाहिली आहे. मात्र, आज एक महिना उलटून देखील पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान तातडीनं द्यायचं असतं ते देखील मिळालेलं नाही. यावरून या सरकारची मानसिकता स्पष्ट होत आहे, असा आरोपही शेट्टी यांनी केला आहे. तसेच महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री यांच्याकडून पूरग्रस्तांची पूर्णता फसवणूक झाली आहे, असा आरोपही राजू शेट्टी यांनी यावेळी केला आहे.


तर पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. सरकारने याची तातडीने दखल घेतली पाहिजे, महाविकास आघाडी निर्माण करणाऱ्या पैकी मी एक आहे, पण मी आघाडी सरकारचा गुलाम नाही, सरकार जिथे चुकणार तिथे मी बोलणार आणि या पुढील काळात हा संघर्ष आणखी तीव्र होईल आणि पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी आम्ही जलसमाधी घेऊ, पण सरकारला गुडघे टेकायला लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा देखील राजू शेट्टी यांनी यावेळी दिला आहे.