Raju Shetti : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांबाबत केलेलं वक्तव्य पूर्णपणे चुकीचं आहे. ऊस उत्पादक शेतकरी हा आळशी नाही. उसासाठी काय काय करावे लागते हे सर्वांना माहित आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे 18 महिने ऊस सांभाळावा लागतो, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे. 


"ऊस हे शाश्वत पीक असले तरी शेतकऱ्यांनी उसासह इतर पिकांचा ही विचार केला पाहिजे असा सल्ला शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी दिला होता. त्यानंतर राजू शेट्टी यांनी यावर बोलताना उसासाठी देखील खूप कष्ट घ्यावे लागतात असे सांगिले.  ते म्हणाले, "उसाच्या नोंदीसाठी साखर कारखान्याचे संचालक आणि चिटबॉयच्या हातापाया पडावे लागते. उसाच्या एफआरपीसाठी आंदोलने करावी लागतात, पोलिसांच्या काठ्या खाव्या लागतात, तुरुंगात जावं लागतं. या सर्व गोष्टी शरद पवार यांना माहिती आहेत. परंतु, आजकाल ऊस उत्पादकांना नावं ठेवण्याची एक पद्धत रूढ झाली आहे. दुर्दैव हे आहे की, याच उसाच्या मुद्यावरुन अनेक जण बँकाचे संचालक झाले, राज्य बँकेवर गेले, राजकारणात पैसा याच आळशी शेतकऱ्यांमुळे मिळाला हे विसरु नका." 


"नदी ओलांडल्यानंतर नावाड्याला जशी शिवी दिली जाते तसा हा सर्व प्रकार आहे. शरद पवार हे दहा वर्षे कृषीमंत्री होते. त्यांना हे माहिती पाहिजे की, ऊस हे एकमेव असं पिक आहे, ज्याला कायदेशीर हमीभावाचे सरंक्षण आहे. आम्ही इतर पिकांना देखील हमीभाव सरंक्षण मागतोय. परंतु, शासनाने जाहीर केलेले हमीभाव केवळ कागदावर राहतात. तुम्ही हमीभावाला सरंक्षण दिलं असतं तर उसा ऐवजी दुसरं पिक घेण्याचा सल्ला देता आला असता, असा टोला राजू शेट्टी यांनी लगावला. 
 
राजू शेट्टी म्हणाले, "18 महिने ऊस शेतात आहे, ही देखील शासनाची चूक आहे. एक वर्षाआधी तुम्हाला लक्षात आले होते की लागवडीचे क्षेत्र किती आहे? राज्यात चालू आणि बंद स्थितीतील कारखाने किती आहेत? त्यांची गाळप क्षमता किती आहे? याचा अभ्यास केला पाहिजे होता आणि बंद असलेले कारखाने चालू करायला पाहिजे होते. असे केले असते तर सर्व ऊस गाळप झाला असता. हे सर्व राज्य सरकारचं अपयश आहे." 


काय म्हणाले होते शरद पवार? 


"ऊस हे आळशी माणसाचं पीक आहे. म्हणजेच, एकदा लागवड झाली की, अधिकचे कष्ट नसतात. किंवा हातमशागतही नसते. लागवडीपासून सिंचन, मशागत आणि तोडणी देखील यंत्राच्या सहाय्यानं. त्यामुळे ऊस हे आळशी माणसाचं पीक आहे. दराचा विचार न करता उत्पादन घेणं सोपं असल्यानं शेतकऱ्यांचा कल याकडे वाढत आहे. शेतकऱ्यांनी ऊस घेण्यापेक्षा हंगामी पिकांसह फळबागांची लागवड करावी.", असं शरद पवार म्हणाले होते.


महत्वाच्या बातम्या


शरद पवार आणि राज ठाकरेंमध्ये बाबासाहेब पुरंदरेंवरुन वाद सुरु असतानाच लेखक जेम्स लेनने केलं भाष्य; पाहा संपूर्ण मुलाखत


Sharad Pawar : कृषीमंत्री असताना देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी केली याचा आनंद : शरद पवार