James Laine Controversial Book : राज्यात सध्या चर्चेत असलेल्या जेम्स लेन प्रकरणात आता मोठा खुलासा झालाय. हा खुलासा दुसरं तिसरं कुणी नाही तर स्वतः जेम्स लेन यांनी केलाय . इंडिया टुडेचे पत्रकार किरण तारे यांना ई मेलवरून दिलेल्या मुलाखतीत जेम्स लेनने बाबासाहेब पुरंदरे यांच्यासह कोणीही त्यांना पुस्तक लिहिण्यासाठी माहिती दिली नाही असं म्हटलंय. त्याचबरोबर बाबासाहेब पुरंदरेंसोबत आपण कधीही चर्चा केली नसल्याचं जेम्स लेनने या मुलाखतीत म्हटलंय. मात्र जेम्स लेन यांच्या या मुलाखतीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि संभाजी ब्रिगेडने अनेक प्रश्न उपस्थित केलेत. जेम्स लेनच्या या मुलाखतीनंतर आता हे प्रकरण कोणतं वळण घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे .
2003 साली प्रकाशित झालेल्या शिवाजी, हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या आपल्या पुस्तकाबद्दल जेम्स लेन यांनी मोठा खुलासा केलाय. इंडिया टुडेचे पत्रकार किरण तारे यांनी ई मेल मार्फत अमेरिकेत असलेल्या लेनशी संपर्क साधून त्यांचं या वादग्रस्त प्रकरणाबाबतच म्हणणं जाणून घेतलय .
प्रश्न - छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त माहिती तुम्हाला कोणी पुरवली ?
हा प्रश्नच मुळात चुकीच्या पद्धतीने विचारण्यात आलाय . बाबासाहेब पुरंदरेच नव्हे तर हे पुस्तक लिहिण्यासाठी मला कोणीही माहिती पुरवलेली नाही. माझं पुस्तक हे या विषया बाबतच्या कथा आणि त्या कथा सांगणाऱ्या लोकांच्या विचारसरणीबद्दल आहे. उदाहरणार्थ - काहीजण छत्रपती शिवाजी महाराजांचा संबंध रामदास स्वामींशी जोडतात तर काहीजण शिवाजी महाराजांचा संबंध संत तुकारामांशी जोडतात. या दोघांपैकी कोण बरोबर आणि कोण चूक हे मी या पुस्तकात सांगितलेले नाही, तर दोन्ही बाजूचे लोक अशी मतं का मांडतात याबद्दल या पुस्तकात मी लिहलंय.
प्रश्न - तुम्ही या पुस्तकात दिलेल्या माहितीचे स्त्रोत काय आहेत ?
उत्तर - जो कोणी माझे पुस्तक बारकाईने वाचेल त्याच्या लक्षात येईल की मी या पुस्तकात इतिहास सांगण्याचा दावा केलेला नाही. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलाय असं ज्यांना वाटतं त्यांचा गैरसमज झालाय. कारण मी इतिहास सांगण्याचा कुठंही दावा केलेला नाही तर आधीपासून अस्तित्वात असलेल्या इतिहासाबद्दल ज्या कथा आणि आणि प्रावाद अस्तित्वात आहेत त्याबाद्दल या पुस्तकात मी लिहलंय.
प्रश्न - तुम्ही बाबाहेब पुरंदरेंसोबत कधी या विषयावर चर्चा केली होती का? आणि केली असेल तर त्यांचं या विषयावर काय मत होतं.
उत्तर - मी बाबासाहेब पुरंदरेंसोबत कधीही चर्चा केलेली नाही .
प्रश्न - जेव्हा तुम्हाला या पुस्तकातील मजकुराबाबत माफी मागावी लागली आणि तो मजकूर मागे घ्यावा लागला तेव्हा तुमच्या मनात कोणत्या भावना होता.
उत्तर - मी या पुस्तकातील मजकुराचे लेखन करताना पुरेसा सावध नव्हतो आणि त्यामुळे इतरांना त्रास सहन करावा लागला याचं मला दुःख आहे .
प्रश्न - बाबासाहेब पुरंदरे आणि त्यांनी लोकप्रिय केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथांबद्दल तुम्हाला काय वाटतं ?
उत्तर - बाबासाहेब पुरंदरे हे छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम जनमानसात पोहचवणारे प्रवक्ते म्हणून ओळखले जात होते. त्यांची ही ओळख बराच काळ कायम राहणारी आहे. पण त्यांच्यावर 18 व्या आणि 19 व्या शतकात घडलेल्या काही घटनांमुळे टीका करण्यास सुरुवात झाली. या काळातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना काहीजणांनी क्षत्रिय मानण्यास नकार दिल्याने असं झालं. मात्र यामुळे एकाच इतिहासाकडे बघण्याचे मराठा दृष्टिकोन आणि ब्राम्हण दृष्टिकोन असे दोन दृष्टिकोन तयार झाले .
प्रश्न - जेव्हा तुम्ही दीड दशकांपूर्वी लिहिलेल्या पुस्तबद्दल आज महाराष्ट्रात सुरु असलेल्या वादांच्या बातम्या वाचता तेव्हा तुम्हाला काय वाटत ?
उत्तर - छत्रपती शिवाजी महाराज हे एक महान नायक होते . त्यांच्या चारित्र्याचा उपयोग अभ्यासासाठी न करता समकालीन राजकारणासाठी होत असल्याचं पाहून मला दुःख होतंय.