मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठाच्या विविध शाखांच्या अंतिम वर्षाच्या (Final Year Exam) परीक्षा रद्द करण्यात यावी अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. राज्यपालांना पत्र लिहून राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी ही मागणी केली आहे.  मे महिना संपत आला तरी राज्यातील विविध विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांचा निर्णय होत नाहीये आणि यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात आहे मला विद्यापीठांचे कुलपती नात्याने तुमच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे असं राज ठाकरे यांनीया पत्रात म्हटलं आहे.

राज्यातील विद्यापीठं आणि महाविद्यालय अंतिम वर्षाच्या अंतिम परिक्षा रद्द करण्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी युजीसी ( विद्यापीठ अनुदान आयोगाला) पत्र पाठवलं होतं. या पत्राबाबत राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी तीव्र आक्षेप घेतला असून त्यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. या पत्रामध्ये अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून लवकर हा अंतिम वर्षतील अंतिम सत्राच्या परीक्षेचा योग्य निर्णय घ्यावा असं या पत्रात राज्यपालांनी मुख्यमंत्री यांना सांगितलं होतं. आता या प्रकरणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उडी घेतली असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुन आणि ही अभूतपूर्व परिस्थिती लक्षात घेऊन या परीक्षा रद्द कराव्या आणि यामध्ये कोणत्याही राजकारणाला तुम्ही थारा देऊ नये, अशी विनंती राज ठाकरे यांनी केली आहे.

विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षेबाबत राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार; राज्यपालांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र


राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे की, कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती इतकी भीषण आहे की, देश गेले दोन महिने लॉकडाऊनमध्ये आहे आणि सध्याची किमान मुंबई आणि पुणे परिसरातील परिस्थिती पाहता हा भाग अजून किती काळ टाळेबंदीत राहील याचं भाकीत कोणीच करु शकत नाही. बरं जर लॉकडाउन शिथील झाला तरी याचा अर्थ करोना संपला असा होत नाही हे आपणदेखील जाणता. अशा परिस्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा अट्टहास कशासाठी आणि कोणासाठी ?,” असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.

राज ठाकरे पत्रात म्हणतात, कोरोनाचा प्रादुर्भाव किती जबरदस्त आहे हे तुम्हीदेखील जाणता असं मी मानतो. मग इतक्या मोठ्या संख्येने या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी घराबाहेर काढून त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आरोग्य धोक्यात घालण्यामागचं प्रयोजन काय ? टाळेबंदीमुळे अर्थव्यवस्थेचं होणारं अपरिमित नुकसान जाणून देखील देशाने इतकी मोठी टाळेबंदी झेलली. का तर जीव वाचला तर पुढे सगळं शक्य आहे. मग याच न्यायाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यायला काय हरकत आहे?,” असंही त्यांनी म्हटलंय.

अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द कराव्या, उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून यूजीसीला परवानगीसाठी पत्र

पत्रात  राज ठाकरे पुढे म्हणतात की, परीक्षा रद्द करणे म्हणजे ससरकट विद्यार्थ्यांना पास करणं असा होत नाही. आधीच्या सेमिस्टर्सच्या किंवा महाविद्यालयांना घेतलेल्या अंतर्गत परीक्षांच्या गुणांच्या आधारावर किंवा त्यांना काही प्रोजेक्ट्स देऊन किंवा इतर अनेक पद्धतीने अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर करता येईल. मला खात्री आहे अनेक शिक्षणतज्ञांनी या विषयीचे मार्ग तुम्हाला सुचवले असतील. पण जर ते नसतील तर आमचं शिष्टमंडळ विद्यापीठांना याविषयी नक्की मार्गदर्शन करेल, असं त्यांनी म्हटलं आहे.