मुंबई : राज्यामध्ये उद्धव ठाकरे सरकार स्थिर आहे. त्यांना पाठिंबा देणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष त्याच्या पाठिशी मजबूत उभे आहे, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे. ते म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना पक्ष एकत्र आहेत. या कोरोनाच्या महामारीतून महाराष्ट्राला बाहेर कसं काढायचं, यासाठी सगळी ताकद लावायची हे सध्या उद्दिष्ट आहे. तिन्ही पक्षाची हीच भूमिका आहे, असं शरद पवार म्हणाले.

राज्यपालांच्या भेटीसंदर्भात ते म्हणाले की, भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल झाल्यापासून एकदाही त्यांना भेटलो नव्हतो. त्यांनी चहासाठी दोन वेळा निमंत्रण दिले होते. म्हणून काल त्यांना भेटायला गेलो होतो, असं ते म्हणाले. मुख्यमंत्री महाराष्ट्रात चांगलं काम करत आहेत. तुम्ही सगळे एकत्र काम करत आहात असं राज्यपाल काल म्हणाले, असंही पवार यांनी सांगितलं.

ते म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मी नेहमी आढावा घेतो. नेहमी स्मारकवर भेटतो. काल मीच मातोश्रीला येतो असं उद्धव ठाकरे यांना सांगितलं होतं. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर एकदाच मातोश्रीवर गेलो होतो. यावेळी कोरोना बाबत आढावा घेतला. कोरोना काळात कशी काळजी घेतली पाहिजे याची चर्चा झाली. कुठे किती रुग्ण आहेत, पावसाळ्यात काय काळजी घ्यायची? रुग्ण संख्या वाढते आहे यावर चर्चा झाली, असंही पवार म्हणाले. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींसह इतर गप्पा झाल्या असंही ते म्हणाले.  सध्या राजकारणाचा विषय नाही. या काळात कोण राजकीय बोलणार? असंही शरद पवार  म्हणाले.

काय म्हणाले संजय राऊत

शिवसेना खासदार आणि महाविकास आघाडीतील महत्वाचे दुवा असलेले संजय राऊत यांनी ट्विट करत सरकार मजबूत आहे. चिंता नसावी, स्थिरतेबाबतच्या अफवा निव्वळ पोटदुखी असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. कोरोनावर लस आणि ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना सापडायचा आहे, असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

कोरोनावर लस आणि ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना सापडायचाय : संजय राऊत

गेल्या तीन चार दिवसामध्ये नेमकं काय घडलं?
गेल्या तीन चार दिवसात राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. काल संध्याकाळी शरद पवार आणि संजय राऊत हे मातोश्रीवर गेले होते. यावेळी उद्धव ठाकरेंबरोबर बैठक झाली. यात विशेष उल्लेखनीय बाब अशी की सत्तास्थापनेच्या पेचात देखील शरद पवार यांनी मातोश्रीची पायरी चढली नव्हती. मग राज्यपालांच्या भेटीनंतर शरद पवार मातोश्रीवर का गेले? असा सवाल उपस्थित होतोय. तसेच ज्या दिवशी सकाळी म्हणजे 23 मे रोजी संजय राऊत सकाळी राज्यपालांना भेटले, त्या दिवशी संध्याकाळी 7.30 ला भाजप नेते किरीट सोमय्या ही राज्यपालांना जाऊन भेटले. यावेळी किरीट सोमय्या यांनी अॅम्ब्युलन्स विषयात निवेदन दिले असल्याची माहिती आहे. त्यांच्या नंतर लगेच रात्री 8.45 च्या सुमारास सचिव मिलिंद नार्वेकर देखील भेटले असल्याची माहिती आहे. 23 तारखेला परत सचिव नार्वेकर लगेच भेटीला का गेले? तसेच काल राज्यपालांच्या कर्टसी भेटीनंतर शरद पवार आणि संजय राऊत लगेच मातोश्रीवर का गेले? असेही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.


सूचनांना राजकारण समजायचे असेल तर त्यांनी गैरसमजात रहावे, देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

राष्ट्रपती राजवट लागू करण्याची नारायण राणेंची मागणी
सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची शरद पवार यांनी भेट घेतली. त्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनीही राज्यपाल यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना थेट राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची जाहीर मागणी केली. कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेली राज्यातील आणि मुंबईतील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. ही परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी झालं आहे. राज्याची अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी या सरकारकडे कोणतीही उपाययोजना नाही, त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी नारायण राणे यांनी केली. महाविकास आघाडी सरकारची कोरोनाशी सामना करण्याची क्षमता नाही. राज्यपालांनी परिस्थिती हाताळण्यासाठी सूचना द्याव्यात. राज्यातील सरकारला नारळ द्यावा आणि राष्ट्रपती राजवट राज्यात लागू करावी, अशी मागणी नारायण राणे यांनी केली. राज्यात अनेकांनी उपासमार होत नाहीत. रोजगार उपलब्ध नाहीत. शिक्षण व्यवस्था कोलमडली आहे. ही परिस्थिती सरकारला हाताळता आलेली नाही, असा आरोप नारायण राणेंनी केला.

राज्य सरकार अपयशी, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा; नारायण राणेंचा 'ठाकरे' सरकारवर हल्लाबोल