Raj Thackeray : प्रत्येक प्रकल्प गुजरातलाच का जातो? राज ठाकरेंकडून प्रश्न उपस्थित
Raj Thackeray : सध्या राज्यातील प्रत्येक प्रकल्प गुजरातमध्ये जाण्याचं सत्र सुरु आहे. यावर बोलताना प्रत्येक प्रकल्प गुजरातलाच का जातो? असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
Raj Thackeray First Reaction : महाराष्ट्रात (Maharashtra News) येणारा प्रत्येक प्रकल्प गुजरातला (Gujarat) जातोय, हे अत्यंत वाईट आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सर्व राज्य ही त्यांच्या मुलांप्रमाणे आहेत, असा विचार करत प्रत्येक राज्याबाबत समान विचार करावा अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी राज ठाकरेंनी एक प्रश्नही उपस्थित केला आहे. प्रत्येक प्रकल्प गुजरातलाच का जातो असा प्रश्न राज ठाकरेंनी (Raj Thackeray) विचारला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष बोलताना म्हणाले की, "आजची बैठक पक्षाच्या इतर संघटना आहेत त्यासंदर्भात आहे. गेली बरीच वर्ष संघटना काम करत आहेत. यासंघटनांमध्ये काम करताना काही समस्या असतील, तर त्यावर तोडगा काढण्यासंदर्भात आजचीही बैठक आहे. 27 नोव्हेंबरला मुंबईतील पक्षाच्या गटाध्यक्षांचा मेळावा गोरेगावला होणार आहे. मेळावा झाला की, 28 तारखेला मी कोकण दौऱ्याला जाणार, त्यानंतर कोल्हापूरला जाऊन देवीचं दर्शन घेणार आहे."
राज्यातील अनेक मोठमोठे प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत. राजकीय वर्तुळात यासंदर्भात अनेक चर्चा होत आहे. एवढंच नाहीतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात यावरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी जडत असल्याचं पाहायला मिळत आहे. यासंदर्भात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "प्रकल्प बाहेर गेला म्हणजे कुठे गेला? मी आधीपासूनची भाषणं काढून तुम्ही पुन्हा ऐकली तर तुमच्या लक्षात येईल की, पंतप्रधान हे देशाचे आहेत आणि त्यांच्यासाठी प्रत्येक राज्य हे त्यांच्या मुलांप्रमाणे असणं आवश्यक आहे. उद्या जर महाराष्ट्रातील हा प्रकल्प बाहेर गेला असता आणि समजा तो प्रकल्प आसामला गेला असता, तर मला वाईट नसतं वाटलं. आजही गुजरातला गेलाय, त्याचं वाईट वाटत नाही, कारण शेवटी देशातच आहे तो. पण मला वाईट या गोष्टीचं वाटतंय की, तो प्रकल्प राज्यात येतोय, तो प्रकल्प गुजरातला जातोय. त्यामुळे पंतप्रधानांनी स्वतः याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक गोष्ट गुजरातलाच जात असेल, तर मग राज ठाकरे महाराष्ट्राबद्दल बोलतो, त्यावेळी त्याला संकुचित बोलण्यासारखं काय आहे?"
पाहा व्हिडीओ : प्रत्येक प्रकल्प गुजरातलाच का? राज ठाकरेंना सवाल
"पंतप्रधानांचा विचार हा विशाल असला पाहिजे आणि मला वाटतो तो संपूर्ण देशासाठी असला पाहिजे. प्रत्येक राज्य मोठं झालं पाहिजे. प्रत्येक राज्यात उद्योगधंदे आले पाहिजे. तिकडच्या लोकांना आपलं घर सोडून बाहेर जायची आणि दुसऱ्या राज्यांवर ओझं बनण्याची आवश्यकता नाही. असे प्रकल्प जर राज्याराज्यांमध्ये गेले, तर संपूर्ण देशाचाच विकास होईल.", असंही राज ठाकरे म्हणाले.
"आजही महाराष्ट्र उद्योगधंद्यांच्या बाबतीत इतर कोणत्याही राज्यांहून पुढे आहे. नेहमीच महाराष्ट्र प्रगतीपथावर राहिलं आहे उद्योगधंद्यांच्या बाबतीत. उद्योजकांनाही महाराष्ट्र हेच त्यांचं प्रथम क्रमांकाचं राज्य असल्याचं वाटत आलेलं आहे. त्यामुळे असं नाही गुजरातमध्ये प्रकल्पांसाठी अनुकूल सोयीसुविधा आहे आणि महाराष्ट्रात नाही. त्यामुळे मला असं वाटतं की, या गोष्टीकडे राजकीय न पाहता देशाचा विकास करण्याच्या हेतूनं प्रत्येक राज्य मोठं करणं ही पंतप्रधानांची जबाबदारी आहे.", असंही राज ठाकरे म्हणाले.