मुंबई : पुढच्या दोन तासात मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात अजून जोरदार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पावसामुळे मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा झाला. ओव्हरहेड वायरवर झाडाची फांदी पडली. त्यामुळे काहीकाळ वाहतूक थांबली होती. हळूहळू लोकल पूर्वपदावर आली आहे. दरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक 10 मिनिटं उशिरानं धावत असल्याची माहिती आहे. हार्बर आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक नियमित वेळापत्रकाप्रमाणे धावत आहे.

एकीकडे पाऊस सुरु असताना दुसरीकडे मुंबईतल्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर ट्रकला अपघात झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तर 5 जण जखमी झाले आहेत. जोगेश्वरीजवळच्या महामार्गावरच ट्रक उलटल्यानं प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाली होती. सध्या महामार्गावरुन ट्रक बाजूला करण्यात आला असून वाहतूक सुरळीत करण्यात आली.



भिवंडीत रात्रीपासून पाऊस
भिवंडीत रात्रीपासून पाऊस कोसळतो आहे. शहरातील तसेच ग्रामीण भागातील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. तर शेकडो घरात आणि दुकानात देखील पाणी शिरलं आहे. या पावसामुळे अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे.

महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस, पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्रबिंदू असलेलं वेण्णा लेकही भरलं
सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वरमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्रबिंदू असलेलं वेण्णा लेकही भरलं आहे. गेल्या 8 दिवसांपासून महाबळेश्वरमध्ये तुफान पाऊस सुरु आहे. त्यामुळे महाबळेश्वर आणि पाचगणीला पाणीपुरवठा करणारी सर्व धरणं भरली आहेत.

जालना जिल्ह्यातील सेलूदमधील धामणा धरण शंभर टक्के भरलं
जालना जिल्ह्यातील सेलूदमधील धामणा धरण शंभर टक्के भरलं. दोन दिवसांपूर्वी धरण क्षेत्रात झालेल्या पावसानं मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आणि धामणा धरण पूर्णपणे भरलेलं पाहायला मिळत आहे. सांडव्याच्या भिंतीला गेलेल्या तड्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होत असल्यानं आजूबाजूच्या गावच्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होतं. दरम्यान, एबीपी माझाच्या बातमीनंतर धरणाच्या गळतीची दुरुस्ती झाली आहे.

मराठवाडा-विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस नाही
मुंबई आणि उपनगरांमध्ये पाऊस होत आहे. मात्र मराठवाडा-विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात अजूनही मुसळधार पाऊस झालेला नाही. ढगांची गर्दी आणि मेघगर्जना ऐकू येत आहेत. मात्र धो-धो पावसाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. पाऊस न झाल्याने या भागातील पेरण्या खोळंबल्या आहेत.