इंदापूर : देहूतून प्रस्थान ठेवल्यानंतर तुकाराम महाराजांचा पालखी मुक्काम दर मुक्काम करत ज्यावेळी पंढरपूरकडे जाते त्याच मार्गामध्ये वारकऱ्यांना रस्त्यामुळे अनेक अडचणी येतात. म्हणूनच सरकारने तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गातील रस्त्यांचा प्रश्न लवकर सोडवावा, अशी मागणी तुकाराम महाराजांचे वंशज अभिजित मोरे यांनी केली आहे.


334 वर्षांपासून हा सोहळा चालू आहे. इतक्या जुन्या आणि मानाच्या या पालखी सोहळ्याच्या मार्ग मात्र मोठा खडतर आहे पाटस पासून तोंडले-बोंडलेपर्यंत एकेरी रस्ता असल्यामुळे त्याच रस्त्यावरून वारकरी आणि त्याच रस्त्यावरून वाहतूक सुरू असते आणि त्यामुळे या रस्त्यावरून वारकऱ्यांना चालणे जिकरीचे झाले आहे.



बारामती ते इंदापूर इंदापूर ते अकलूज हा रस्ता इतका खडतर आहे की, या मार्गावरून एकेरी वाहतूक होत असल्याने वारकरी पुढे चालत जातात आणि वारकऱ्यांचा साहित्य घेऊन जाणारे ट्रक, साहित्य असणारी वाहनं मात्र मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचत नाहीत.

अनेक वेळा तर वारकऱ्यांना जेवणाच्या व्यवस्थेच्या ठिकाणी वेळेवर पोहोचत नाहीत. सोबतच त्यांना लागणारे कपडे आणि इतर साहित्य देखील त्यांना अनेकदा वेळेवर मिळत नाही. तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये येणारा वारकरी वर्ग मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. आज साडेतीन लाखांपेक्षाही जास्त लोक या सोहळ्यामध्ये सहभागी झाले आहेत. असे असताना रस्ता मात्र तेवढाच आहे.



आम्ही या रस्त्याची मागणी मागील दहा वर्षापासून सरकारकडे करत आहोत. मात्र अद्याप सरकारने याकडे कुठेही लक्ष दिलेले नाही. आमची विनंती आहे की सरकार जे काही साहित्य वारकऱ्यांना देतो त्यापेक्षा आम्हाला रस्त्याचा प्रश्न मोठा आहे. कारण रस्ता चांगला असेल तर हा सगळा समाज मुक्काम दर मुक्काम करून जात असतो. त्यामुळे आमची सरकारला विनंती आहे की सरकारने लवकरात लवकर या पालखी मार्गाच्या रस्त्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी तुकाराम महाराजांचे वंशज अभिजीत मोरे यांनी केली आहे.