औरंगाबादच्या हर्सूल जेलमध्ये कैद्यांना सोडवणारे रॅकेट, बोगस जामिनपत्र दाखवत कैद्यांचा पलायनाचा प्रयत्न
औरंगाबादच्या हर्सूल मध्यवर्ती कारागृहात बनावट जामिनपत्रांचा एक प्रकार समोर आला आहे. मोक्कातील तीन कैद्यांनी ही बनावट जामिनपत्र तयार केली होती.
औरंगाबाद : औरंगाबादच्या हर्सूल मध्यवर्ती कारागृहात बोगस जामिनपत्र दाखवून पळून जाण्याचा कट उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांना वेळीच संशय आल्यानं हा प्रकार उघड झाला आहे. मोक्काच्या दोन कैद्यांचे जामिनपत्र जेलच्या लेटर बॉक्समध्ये पोलिसांना आढळून आले. संशय आल्यानं पोलिसांनी त्या जामिनपत्राची शहानिशा करण्यासाठी बीडच्या कोर्टाला पत्र पाठवले. त्यात आम्ही जामिन दिलाच नसल्याचं कोर्टानं सांगितले. या प्रकरणाची चौकशी सुरु असतांना एका कैद्याला कोर्टात हजेरीसाठी नेत असताना त्याच्याजवळही बोगस जामिनपत्र आढळून आले. त्यात त्यानं जेलमधील एका कैद्यानंच ते बाहेरून बनवून आणून दिलं असल्याचं सांगितलं आणि खळबळ उडाली.
या तिन्ही आरोपींकडून ते जामिनपत्र जप्त करण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांना तीन लोकांची जामिनपत्र सापडली आहेत. मात्र हे किती दिवसापासून सुरू होतं हा प्रश्न आहे. पोलिस या प्रकरणी चौकशी करत असून बनावट कागदपत्राद्वारे किती कैदी बाहेर गेले हे स्पष्ट होईल.
या प्रकरणात आरोपींनी हुबेहुब कोर्टाचे कागदपत्र बनवले आहे. अगदी कोर्टाचे शिक्के सुद्धा बनवले आहेत. नक्की किती दिवसांपासून हा प्रकार सुरु आहे, याचीही माहिती घेण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.
हा सगळा प्रकार धक्कादाय आहे. थेट जामिनाची कागदपत्रचं खोटी बनवून जेलमधून बाहेर निघण्याचा हा नवा फंडा आरोपींनी शोधला आहे. यामध्ये काही पोलिसांचाही समावेश असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र काही पोलिसांच्या सतर्कतेनं किमान हे प्रकरण पुढं आले हे ही तितकंच खरं आहे.त्यामुळं आता या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. त्यातूनच हे असले प्रकार किती दिवसांपासून सुरु आहे आणि किती लोक आतापर्यंत पळून गेले याची माहिती पुढं येईल.